बेघर ,भिक्षुक , कामगार वर्ग यांस पुणे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राचा मदतीचा आधार…

1027

गणेश जाधव, कोंढवा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या परिस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या निवारा केंद्रात कामगार वर्ग ,बेघर ,भिक्षुक तसेच लॉक डाऊन मध्ये अडकलेले प्रवासी आधार घेत आहेत.
लॉक डाऊनच्या काळात अनेक लोकानी निवारा केंद्राची वाट धरली आहे.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निवारा केंद्रात दाखल झालेल्या लोकांना निवार्‍याची सोय तसेच जेवणाची सोय करण्यात येत आहे .

कोंढवा खुर्द येथील श्री. संत गाडगे महाराज महानगरपालिका शाळेतील निवारा केंद्रात एकूण १०१ लोकांची निवार्‍याची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे त्यासाठी एकूण संपूर्ण शाळा व्यवस्थापनाकडे देण्यात आली आहे .निवारा केंद्रातील रहिवाशी हे कर्नाटक, उत्तर प्रदेश ,झारखंड ,बिहार छत्तीसगड ,आसाम, इ. राज्यातून आलेले बहुसंख्य कामगार वर्ग येथे निवासासाठी आले असल्याचे समजते तसेच पुणे शहरालगत असलेली एकंदरीत २०-२५ भिक्षेकरी देखील पोलिसांच्या मदतीने येथे दाखल झाल्याचे सांगण्यात आले .सर्व निवासी रहिवाशी पोलिसांच्या मदतीने दाखल करून त्याची नोंद पालिका प्रशासनाकडे करण्यात येत असल्याचे देखील कळले .पोलीस प्रशासन निवारा केंद्रास भेट देऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेत असल्याचे समजले.

निवारा केंद्रातील लोकांशी संपर्क साधला असता सकाळचा नाष्टा ,दोन वेळचे जेवण तसेच निवारा व्यवस्था यासंदर्भात येथील कर्मचारी व अधिकारी वर्ग अतिशय नियोजनयुक्त पद्धतीने हाताळत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. निवारा केंद्रात राहणाऱ्या रहिवाशांची दर दोन दिवसाने
वैद्यकीय तपासणी केली जाते याकरिता महानगरपालिकेकडून एक विशेष वैद्यकीय पथक कार्यरत आहे . इतर कार्यालयीन कर्मचारी ,सेवक वर्ग ,शालेय रखवालदार देखील निवारा रहिवाशांना भावनिक साद घालून त्यांची काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले .महानगरपालिकेकडून निवारा केंद्रातील रहिवाशांना मास्क, सॅनीटायझर, हॅन्ड ग्लोज, इ.गोष्टी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुरवण्यात येत आहेत.

निवारा केंद्राच्या सुरक्षेची पाहणी कोंढवा खुर्द पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उपनिरीक्षक विनायक गायकवाड यांच्यामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांकडून दररोज करण्यात येत आहे तसेच वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त कुंजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी वसीम सय्यद तसेच उपअभियंता राहुल साळुंखे तसेच मनपा कर्मचारी विजय जगताप, शालेय कर्मचारी अतुल ठोंबरे ,शहबाज पंजाबी, महादेव माळी ,मनिषा अहिरे आदि निवारा केंद्राची संपूर्ण व्यवस्था नियोजनबद्ध काटेकोरपणे पाहत असल्याचे समजले .महानगरपालिकेच्या वरिष्ठांकडून मिळत असलेल्या सूचनांचे पालन देखील निवारा केंद्रातील रहिवाशी करत असल्याचे कळले.