27मार्च ला सर्वेक्षण आदेश आले.आदेशात स्वतःच नाव बघून मन खचून गेलं.पण राष्ट्रीय आपत्ती आहे.आपण या लढाईत योगदान दिलं पाहिजे म्हणून मनाची तयारी केली. घरातून बाहेर पडताना आपोआप डोळ्यात अश्रू जमा झाले. कारण आपण जे काम करायला चाललोय ते करताना आपण स्वतःचा,आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहोत, हे कळत होतं. मुलांनी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा “”तू नको जाऊ हे काम करायला!!””हे व्याकुळ शब्द जीव घायाळ करत होते. पण काळजावर दगड ठेवून मुलांची समजूत घातली.
लग्न होऊन सासरी जाताना सुद्धा एवढं वाईट वाटलं नसेल तेवढं आज मन भरून आल होत पण…..
राष्ट्रीय आपत्ती, कोरोनारुपी राक्षसाशी युद्ध करायला आम्ही सज्ज झालो होतो. 14दिवस योगदान दिल्यानंतर आपली या कामातून सुटका होणार!या भाबड्या आशेने जो तो शिक्षक धावत होता. आग ओकणा-या सूर्याच ते तीव्र ऊन अंगावर झेलत काम चालू.
अनेकांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या….
पण ते ऐकून घेणार कुणीच नव्हतं.
अक्षरशः एवढ्या ऊन्हातान्हात, पाण्याचा एक घोटही पिता येत नव्हता. तोंडावरचा स्कार्फ सोडायलाही खूप भिती वाटत होती. पाणी पिणे नाही…..खाणं तर दूरची गोष्ट….महिला म्हणून अनेक शारीरिक त्रास…..
आणि मानसिक त्रास ….
पण सगळं सहन करत आम्ही अजूनही हे काम करतोच आहोत. 14दिवस पूर्ण झाल्यावर 24दिवस काम करावे लागेल अस परिपत्रक निघाल…..आमचं काम सुरुच. 24दिवस संपत आले तेव्हा ज्या लोकांनी 24दिवसात 2400घरांचा सर्वे पूर्ण केला आहे,त्यांना 3दिवस सुट्टी मिळेल असा उल्लेख होता.
एवढ्या ऊन्हातान्हात लोकांच्या रोषाला सामोरे जात, अनेक वाईट अनुभव घेत, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत कोणालाही 2400घर पुर्ण करण शक्य झालं नाही. संपूर्ण पुणे महापालिकेत एकही शिक्षक हि 3दिवसाची सुट्टी घेऊ शकला नाही
…..आमचं कोरोनाविरुद्ध युद्ध चालूच….
बर…आमच्या आरोग्याची काळजी म्हणजे सुरुवातीला चौघात एक सॅनीटायझर, एक साधा मास्क…..एवढंच साहित्य पुरवून आम्हाला सर्वेला पाठवलं गेल.त्यानंतर आठवड्याने पुन्हा एक साधा मास्क आणि हॅन्डगलोज(use and throw)दिले गेले. पुढच्या आठवड्यात दोघांत एक सॅनीटायझर (50 ml प्रत्येक वेळी) व कॉटनचा साधा मास्क…..
अशा तुटपुंज्या साहित्यावर आम्ही आमचं योगदान देत आहोत.
अनेक वाईट अनुभव घेत आहोत.
1)माझ्या एक सहकारी शिक्षिका स्वतः कॅन्सर पेशंट आहेत. ट्रीटमेंट चालू आहे.डोक्यावर, अंगावर केस नाहीत!!!त्यांच्याकडे पाहूनही त्यांच्या आजाराविषयी जाणीव होते .पण…..त्यांनाही रोज येऊन ऑफीसला बसायला लावत होते.
2)एक भगिनी मुलं होण्यासाठी मागील काही वर्षांपासून उपचार घेत आहेत. सर्वेक्षण काम करताना त्यांना त्रास झाला, म्हणून तपासणी केली तर,एक कोवळा जीव त्यांच्या कुशीत अंकुरत आहे… . हसावं की रडावं….?पण कामातून सुटका नाही……
3)कोरोनामुळे घरकाम करणा-या मावशींना सुट्टी. पाळणाघरे बंद. पती पत्नी दोघांना ड्यूटी. अंगावर दुध पिणा-या लहान मुलांना सोडून येताना काय अवस्था होत असेल त्या मातेची?
4) काही माता आपल्या मुलांना सांभाळायला कोणी नाही. शेजारी तरी किती दिवस सांभाळतील ?कोरोनामुळे जो तो घाबरलेला…
अशा वेळी आपली मुलं घरात कोंडून, काळजाच पाणी पाणी होत असताना हे काम करत आहेत.
5) एक सहकारी शिक्षिका ,त्यांच्या पतीला दोन महिन्यांपूर्वी कॅन्सर असल्याच निदान झालं. पतीच्या उपचारासाठी या कामातून सवलत मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केला. पण स्वतः पेशंट नाही ना….मग काम करावाच लागेल, अस सांगून त्यांना कामाला जुंपल गेलं.दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे दुःखद निधन झाले!!!!
6)एका मॅडमच्या पतीच्या गेल्या वर्षी दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. सुदैवाने त्यांच्या काकांनी स्वतःची एक किडनी दिल्याने जीव वाचला.दुर्दैवाने त्यांच्या सासुबाईंनाही तोच त्रास. आठवड्यातून दोनदा डायलिसीस करावे लागते. त्यांनाही या कामातून सुटका करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले.
7) बिपी,शुगर ,दमा असे त्रास होणारे, अपंग, या महिन्यात व पुढच्या महिन्यात रिटायरमेंट होणारेही या कामात ओढले गेले.
शिक्षण विभागाने या कोणत्याही समस्या विचारात न घेता संपुर्ण शिक्षण विभागच या कामासाठी वर्ग केला.
8)मासिक पाळीच्या काळात महिलांना होणारे शारीरिक त्रास ही कोणी विचारात घेतले नाहीत…
9)माझी सहकारी लॉकडाऊन घोषीत केल्यावर कुटुंबासह गावी गेली.सर्वे ऑर्डर आल्यावर पती व मुलांना गावी ठेवून एकटीच पुण्यात आली.14दिवस काम…नंतर गावी जाऊ….अस तीला वाटल…पण एवढे दिवस झाले तरी कामातून मुक्त नाही. लहान मुलांच्या विरहाने सारखी रडते….
गावी सावत्र सासुबाई मुलांशी व पतीशी तुसडेपणाने वागतात.प्रचंड मानसिक त्रास सहन करतिये ती….
अशा कितीतरी समस्यांना आम्ही सामोरे जात आहोत.
शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून या कामातून महिला शिक्षिकांना वगळावे,गरोदर माता,स्तनदा माता,अपंग, ज्यांचे पती अत्यावश्यक सेवेत आहेत अशा महिला, बिपी,शुगर, दमा पेशंट,दुर्धर आजार असणारे लोक, 50वर्ष वयापुढील लोक, इत्यादी…
अशा लोकांना या कामातून मुक्तता मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले.आयुक्त, महापौर, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, शरद पवार साहेब यांना आमच्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिली.विनंती केली…पण……
दोन दिवसांपूर्वी गरोदर,स्तनदा माता,55वर्ष वयापुढील व्यक्ती,अपंग,यांची या कामातून सुटका होईल असे परिपत्रक निघाले आहे…..
पण एवढे दिवस आम्ही जे भयानक वास्तव अनुभवतोय त्याचे काय?
उत्तर अजूनही सापडत नाही……
अनेकांनी सहन केलेले असे किती तरी अनुभव असतील, जे शब्दात व्यक्त झाले नाहीत…
फक्त सहन करुन तिथेच दडपून टाकले असतील.. .
आता मात्र प्रत्येकजण मनापासून एवढंच म्हणेल… ..
कुणी सुट्टी देत का सुट्टी. …..?
हे अनुभव कोणाला दुखावण्यासाठी नव्हे तर मन मोकळं करण्यासाठी मांडलेत
एक त्रस्त शिक्षिका