पालकमंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे रायगडवासियांची केली विचारपूस

561

गिरीश भोपी,रायगड

करोनाच्या आणि राज्यभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
आपण सर्वजण आत्मविश्वासाने व संयमाने या परिस्थितीचा सामना करीत आहोत. या चिंताजनक परिस्थितीतून आपण सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला.
पालक मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, जिल्ह्याची सद्य:स्थिती पाहता पनवेल मनपा, पनवेल ग्रामीण, खारघर, कामोठे, कळंबोली येथे कराेना विषाणूचा थोड्या अधिक प्रमाणात प्रादूर्भाव आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना याची लागण होत आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढविले आहेत. आतापर्यंत 202 जण बाधित असून 60 जण बरे झाले आहेत. या सर्वांची आरोग्य यंत्रणा आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे, उपचार सुरू आहेत. या रुग्णांची तब्येत स्थिर आहे आणि यापैकी बरेचजण बरे होण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने लॉकडाऊन कालावधीतही दिलेल्या सवलतींचा जनतेने दुरुपयोग न करता स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
मुंबईत अडकलेल्या कोकणातील चाकरमान्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. सगळ्यांना आपल्या मूळ गावी,त्यांच्या घरी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पण हे काम टप्प्याटप्प्याने होईल, असा विश्वास त्यांनी रायगडवासियांना दिला.
जिल्ह्यात जवळपास एक लाखाहून अधिक परतलेल्या नागरिकांना आपापल्या गावी पाठविण्यात आले असून सर्वांना होमक्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
रायगड जिल्ह्यातील काही भाग ऑरेंज झोन असल्याने त्या भागातील दुकाने, व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हे करताना सुरक्षिततेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जायलाच हवेत, जी मुभा मिळाली आहे त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, अशा सूचनाही कु.आदिती तटकरे यांनी केल्या.
रायगड मध्ये अडकलेल्या परराज्यातील तसेच परजिल्ह्यातल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात किंवा जिल्ह्यात परत जाण्यासाठी ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यानुसार नोंद करून घेणे, कराेनाचा प्रादूर्भाव वाढू नये, याची खबरदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन कु.आदिती तटकरे यांनी यावेळी नागरिकांना केले.
यावेळी लाॅकडाऊननंतर पर्यटनस्थळांवर होणारा परिणाम याबाबत देखील नागरिकांनी विचारणा केली, त्यावेळी कु.तटकरे यांनी त्याबाबत शासन टप्प्याटप्प्याने नियोजन करून ही पर्यटनस्थळे सुरू करणार असल्याचे सांगितले.
शाळा सुरू होण्यासंदर्भात परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पनवेल येथील शासकीय कोविड रुग्णालयाची क्षमता वाढविण्यात येत आहे, 5 ते 6 हजार फ्लॅट, बेड सुविधा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, इतर रुग्णालयांमध्ये स्वब टेस्टिंग साठी क्यूबिकल स्वाब टेस्टिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मान्सूनपूर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले असून नुकसान भरपाई साठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी शेवटी सांगितले.
गणपती कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी गणपती मूर्ती कारखानदारांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, लाॅकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगडवासियांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेल्या या संवादाबाबत अनेक नेटकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले, अनेकांनी पालकमंत्री या नात्याने कु. आदिती तटकरे करीत असलेल्या कामाबद्दल खुल्या दिलाने प्रशंसाही केली तर काहींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याचाही त्यांना सल्ला दिला.