लॉकडाऊनमुळे जिल्हयात अडकलेले परराज्य तसेच जिल्हयाबाहेरील नागरिक आपल्या मूळगावी रवाना

1220

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे नियोजन

पुणे प्रतिनिधी

लोकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळया अधिका-यांकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदा-या देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रशासनाकडून या नागरिकांची यादी तयार करुन संबंधित राज्यांकडे परवानगी घेण्याची प्रक्रीया गतीने सुरु करण्यात आली आहे. यानुसार नागरिकांना शासनाने विहीत केलेल्या नियमांनुसार तसेच सोशल डिस्टनंसिंगचे काटेाकोर पालन करुन प्रवासाला परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा अत्यंत काळजीने याबाबतचे नियोजन करत आहे.
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या या मोहिमेंतर्गत आज देहू येथील तात्पुरता निवारा केंद्रातील 20 नागरिकांना सोलापूर येथे रवाना करण्यात आले. स्वारगेट येथून दोन एसटी बसमधून 43 विद्यार्थ्यांना जळगाव येथे तसेच मौजे शिवे येथून 24 कामगारांना हिंगोली, नांदेड येथे रवाना करण्यात आले तसेच आणि कामशेत, तालुका मावळ येथून 110 मजूरांना 5 बसमधून लातूर, वाशिम येथे पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी हाती घेततेल्या उपक्रमातून यापूर्वी कोटा ( राजस्थान) मधून एकूण 74 विद्यार्थ्यांना धुळे आगाराच्या चार एसटी बसेसमधून स्वारगेट येथे आणण्यात आले तसेच प्रजापती ब्रम्हकुमारी, माऊंट अबू ( राजस्थान) येथे अडकलेल्या 80 साधकांनादेखील विशेष वाहनाने पुण्यात आणण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लंडनहून आलेल्या विमानाने पुणे जिल्हयातील 65 नागरिक आले. या नागरिकांना बालेवाडी येथील हॉटेल सदानंद रिजन्सी येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत येथील परराज्यातील 24 मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याकरीता राजस्थान येथे बसमूधन पाठविण्यात आले. तसेच श्रमिक स्पेशल रेल्वेने वेगवेगळया निवारागृहांमध्ये असलेल्या मध्यप्रदेशातील 1093 मजूरांना उरुळी कांचन येथून रेवा ( मध्य प्रदेश) येथे पाठविण्यात आले, तर 1131 मजूरांना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे विशेष रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
राज्यांतर्गत मजूरांपैकी नांदेड जिल्हयातील 38 मजूरांना तीन वाहनांमधून तर शिरुर येथील तीन निवारागृहांमधील 38 मजूरांना विशेष बसने वाशिम जिल्हयातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.