मुंबई : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे तसेच मुंबई पालिका आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.
ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.
आपण आपत्तीत बचाव कार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
*गेल्या वर्षी प्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको*
गेल्या वर्षी प्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या
*कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत*
मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधानिशी काम करू लागलो. नाले सफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तत्काळ बुजविणे महत्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्न धान्य, औषधी पूर्वाधा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसत्यही चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.
*मेघदूत आणि उमंग मोबाईल एप*
भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की राज्यात पाउस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाउस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाउस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाउस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाउस झाला होता असे ते म्हणाले.
*मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क*
मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाउस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.
मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.
*पावसाळ्यात समस्या येऊ नये म्हणून मुंबई पालिका सज्ज*
मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या . त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.
प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे. मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे.
३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत.
५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.
गेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले..
तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून ८ एअरक्राफ्ट देखील आहेत.याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले.
भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत सेन्ट्रल कमांडिंग सेंटर मधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.