रायगड मध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठक

625

गिरीश भोपी, रायगड

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे नियोजन भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माझ्यासमवेत माननीय खा. श्री. सुनिल तटकरे साहेब, आ. श्री. रविशेठ पाटील, आ.श्री. भरतशेठ गोगावले, आ.श्री. महेंद्रजी दळवी, आ. श्री. अनिकेतभाई तटकरे, आ.श्री. बाळारामजी पाटील, आ. श्री.प्रशांतजी ठाकूर, आ.श्री. महेशजी बालदी, जिल्हाधिकारी सौ. निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रायगड जिल्ह्यातील स्वॅब टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, लवकरच ही लॅब अलिबागमध्ये सुरु होईल. करोनाची लक्षणे दिसून येणार्‍या व दारिद्रयरेषेखाली असणार्‍या लोकांची स्वॅब टेस्ट करण्यासाठी होणारा खर्च जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात येईल असे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मेट्रोपोलिस लॅब यांच्याशी समन्वय साधल्यानंतर त्या लॅबने जिल्ह्यातील १० हजार लोकांचे स्वॅब टेस्टींग मोफत करुन देण्यात येईल, असे निश्चित झाल्याने त्याबद्दल आयुक्त सुधाकर देशमुख आणि मेट्रोपोलिस लॅबचे या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींकडून विशेष अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

आरोग्य यंत्रणेमधील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा कोविड-१९ च्या कामकाजासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दिल्या जाणार नाहीत. कोविड-१९ रुग्णालये (DCH), कोविड आरोग्य केंद्र (DCHC) आणि कोविड उपचार केंद्र (CCC) या ठिकाणच्या आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची काळजी घ्यावी अशा सुचना दिल्या.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची यादी सादर करावी. तसेच जिल्हयातील ॲम्ब्युलन्स वाहनचालकांचे प्रबोधन करुन त्यांना धैर्य देऊन ते कोविड रुग्णाला नेण्यासाठी नकार देणार नाहीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न करावेत.
करोनाबाधित रुग्णांना ने-आण करण्यासाठी ॲम्ब्युलन्सच्या वाहनचालकांना सुरक्षेविषयी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या मात्र कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यामुळे कामावर न जाऊ शकणाऱ्या कामगारांबाबत, कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या आस्थापनांना अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये,असे पत्र प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. येणाऱ्या पुढील काळासाठी सर्वजण एकजुटीने खंबीरपणे उभे राहू या, असेही उपस्थितांना आवाहन केले.

करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन मिळून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सदैव तत्पर असून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन केले.