‘निसर्ग’ आपत्‍तीत शासन जनतेच्‍या पाठीशी

1059

पुणे प्रतिनिधी,

आई जशी संकटाच्‍या येळेला कंबर बांधून लेकरांच्‍या पाठिशी वुभी राहती, तसंच तुमी प्रजेसाठी वुभे रहावा’ अशा शब्‍दांत मावळ तालुक्‍यातील पवळेवाडी येथील 70 वर्षी सावित्रीबाई गुणाजी जागेश्‍वर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. ‘निसर्ग’ चक्रीवादळात त्‍यांच्‍या फुलशेतीचे अतोनात नुकसान झाले असले तरी या संकटाच्‍या काळी शासन आपल्‍या पाठीशी उभे आहे, हा विश्‍वास त्‍यांच्‍या शब्‍दां-शब्‍दांतून ओसंडून वाहत होता. आपदग्रस्‍तांना दिलासा मिळावा तसेच शासन आपल्‍या पाठीशी उभे आहे, ही भावना निर्माण व्‍हावी यासाठी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्‍ह्याचा दौरा केला, त्‍यावेळी श्रीमती सावित्रीबाईंनी उपमुख्‍यमंत्री पवारांना एक प्रकारे साकडेच घातले.

उपमुख्‍यमंत्री पवार यांनी मावळ तालुक्‍यातील भोयरे, पवळेवाडी, खेड तालुक्‍यातील नवलाख उंबरे, करंजविहिरे, शिवे, वहागाव, धामणे, जुन्‍नर तालुक्‍यातील सावरगाव, पांढरे, येणेरे, ढगाडवाडी या भागाचा दौरा केला. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍यासह आमदार सुनील शेळके, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, उपविभागीय अधिकारी संजय तेली, संदेश शिर्के, सहायक जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसिलदार सुचित्रा आमले, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आणि इतर अधिकारी त्‍यांच्‍यासमवेत होते. यावेळी उपमुख्‍यमंत्री पवार यांनी आपद्ग्रस्‍त शेतकरी, नागरिकांच्‍या भावना जाणून घेवून त्‍यांना दिलासा दिला. त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्‍ह्यातील जुन्‍नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरुर आणि इंदापूर या तालुक्‍यातील 371 गावात मोठे नुकसान झाले आहे. नजरअंदाज अहवालानुसार बाधित शेतक-यांची संख्‍या 28 हजार 496 इतकी असून एकूण बाधित क्षेत्र 7 हजार 874 हेक्‍टर इतके आहे. पुरंदर, जुन्‍नर, शिरुर, आंबेगाव, खेड, हवेली, वेल्‍हा, मावळ आणि मुळशी या तालुक्‍यातील एकूण 87 गावातील 317 शेतक-यांच्‍या पॉलिहाऊस, शेडनेटचेही नुकसान झाले. हे बाधित क्षेत्र सुमारे 100 हेक्‍टर इतके आहे. जिल्‍ह्यातील बाजरी 572.50 हेक्‍टर, कांदा 35.40 हेक्‍टर, मका 574.65 हेक्‍टर, भाजीपाला 2692.72 हेक्‍टर, फळपिके 2906.10 हेक्‍टर, इतर पिके 1092. 45 हेक्‍टर असे एकूण 7874 हेक्‍टरवरील शेतीपिके, भाजीपाला आणि फळपिके यांचे नुकसान झाले.

जिल्‍ह्यात खेड तालुक्‍यातील वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण नवले (वय 47 वर्षे) यांचा भिंत पडून, हवेली तालुक्‍यातील मोकरवाडी येथील प्रकाश किसन मोकर (वय 52 वर्षे) यांचा उडणारा पत्रा पकडतांना आणि जुन्‍नर तालुकयातील अजित साहेबराव साळुंखे (वय 18 वर्षे) यांचा अंगावर झाड पडल्‍याने दुर्दैवी मृत्‍यू झाला. वहागाव येथे उपमुख्‍यमंत्री पवार यांच्‍या हस्‍ते नवले यांच्‍या वारसांना प्रती व्‍यक्‍ती 4 लाखांचा धनादेश वितरित करण्‍यात आला.

निसर्ग चक्रिवादळामध्‍ये खेड तालुक्‍यातील वहागाव येथील सर्वेश नारायण नवले आणि तानाजी अनंत नवले हे भिंत पडून जखमी झाले. मुळशी तालुक्‍यातील धनवेवाडी येथील दिलीप नारायण धनवे हे डोक्‍याला पत्रा लागल्‍याने जखमी झाले.जखमींवर रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे जिल्‍ह्यातील नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 164 अंगणवाड्या, 273 शाळा, 23 स्‍मशानभूमी व दशक्रिया रोड तर 20 ग्रामपंचायतीचे नुकसान झाले आहे. बाधित गोठे 353 तर मयत जनावरे 26 आहेत. 200 झोपड्यांचे नुकसान झाले आहे. पूर्णत: नुकसान झालेली पक्‍की घरे 119, अंशत: नुकसान झालेली पक्‍की घरे 1668, पूर्णत: नुकसान झालेली कच्‍ची घरे 200, अंशत: नुकसान झालेली कच्‍ची घरे 4522 आहेत. भोर, वेल्‍हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव,जुन्‍नर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, हवेली, पुरंदर, शिरुर, दौंड या तालुक्‍यांमध्‍ये घरांचे, शाळेचे पत्र्याचे शेड उडून जाणे, झाडे कोसळणे, वीज खांब पडणे यासारख्‍या घटना घडलेल्‍या आहेत. या सर्व घटनांचे पंचनामे करण्‍यास प्रारंभ झाला आहे.

नुकसान भरपाई – 13 मे 2015 च्‍या शासन निर्णयानुसार मयत व्‍यक्‍तींसाठी 4 लाख रुपये, 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त अपंगत्‍व आलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी 2 लाख रुपये, 40 ते 60 टक्‍के अपंगत्‍व आलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी 59 हजार 100, जखमी व्‍यकतीच्‍या इस्पितळ कालावधीनुसार 4300 ते 12 हजार 700 रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाते. मोठ्या मयात दुधाळ जनावरांसाठी 30 हजार रुपये, छोट्या मयत दुधाळ जनावरांसाठी 3 हजार रुपये, ओढकामाच्‍या लहान मयत जनावरांसाठी 16 हजार रुपये, ओढकामाच्‍या मोठ्या मयत जनावरासाठी 25 हजार रुपये, प्रती मयत कोंबडीसाठी 50 रुपये (जास्‍तीत जास्‍त प्रती कुटुंब 5 हजार रुपये) नुकसान भरपाई दिली जाते.

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा परिषदेने हाय अलर्ट आणि अलर्ट अशा दोन प्रकारे तालुकयांचे वर्गीकरण करुन नियोजन केले होते. जेसीबी व वूडकटर यांची उपलब्‍धता ठेवली. जीवित व वित्‍त हानी कमीतकमी व्‍हावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांशी समन्‍वय आणि पाठपुरावा ठेवला. कच्‍च्या भिंतीच्‍या घरात राहणा-या नागरिकांच्‍या सुरक्षिततेचा आढावा घेण्‍यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांच्‍यासोबत ऑडिओ ब्रिज निर्माण केला. संस्‍थात्‍मक विलगीकरण केंद्रे आणि कोवीड केअर सेंटर यांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य दिले. सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि उपकेंद्रे आपत्‍तीकाळात सुध्‍दा सुरु राहतील याची दक्षता घेतली. पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल, आशा आणि अंगणवाडी सेविका तातडीच्‍या मदतीसाठी गावात उपस्थित राहतील याची दक्षता घेण्‍यात आली. जिल्‍हा परिषदेची ‘राजगड आपत्‍कालिन महिला घरदुरुस्‍ती योजना’ असून नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये घराच्‍या भिंतीची पडझड झाल्‍यास 25 हजार रुपयांपर्यंत आणि चक्रिवादळात घराचे पत्रे उडून गेल्‍यास 10 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. यासाठी गरजू आणि पात्र महिला लाभार्थी ग्रामीण भागातील असणे आवश्‍यक आहे.

‘निसर्ग’ चक्रिवादळ ही एक नैसर्गिक आपत्‍तीच होती. निसर्गापुढे मानवाचे काहीही चालत नसले तरी योग्‍य ती खबरदारी आणि विविध विभागात समन्‍वय असल्‍यास जीवित व वित्‍तहानी टाळता येवू शकते. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्‍या निमित्‍ताने हे प्रकर्षाने जाणवले.