निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी मदतीचे वाटप गतिमानतेने करावे -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

488

गिरीश भोपी,अलिबाग,

जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप गतिमानतेने करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

चक्रीवादळामुळे जिल्हयात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रकृती रिसॉर्ट, काशिद, ता.मुरुड येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, आर.सी. घरत, अनंत गोंधळी, अॅड. प्रविण ठाकूर, अॅड. श्रद्धा ठाकूर आदि उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासन सज्ज होते. याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा.शरद पवार व अन्य मंत्री महोदयांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली आहे. यामध्ये खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनधीही सहभागी झाले होते. नुकसानग्रस्तांसाठी आधी जे मदतीचे निकष होते त्यात शासनाने बदल करुन शासनाकडून वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी 1 लाख 50 हजार व कपडे, भांडी यासाठी 10 हजार असे एकूण 1 लाख 60 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. याआधी आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत दिली जात होती. आता त्यामध्ये शासनाने वाढ करुन हेक्टरी 50 हजार रुपये केले आहेत.

कोकणातील शेतीचे मोजमाप हे गुठ्यांमध्ये होत असल्यामुळे प्रति गुंठ्यासाठी अधिकाधिक मदत कशी देता येईल,यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मदतीचे वाटप गतिमानतेने व्हावे,यासाठी शासन काळजी घेत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी काही समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगून श्री.थोरात पुढे म्हणाले, जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रहाने भूमिका केंद्र शासनाकडे मांडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटपही करण्यात आले. प्रारंभी त्यांनी नागाव, काशिद येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच निसर्ग चक्रीवादळात ज्यांच्या घराचे, फळबागांचे, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी ही केवळ मदत नसून हे माझे कर्तव्य आहे, या भावनेतून शासनाकडून दिली जाणारी मदत तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल.

बैठकीच्या सुरुवातीला तहसिलदार विशाल दौंडकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. तसेच रायगडवासियांच्या वतीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार माणिकराव जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसेच नागाव, काशिद ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.