अभिनेते सयाजी शिंदे यांचे हस्ते देहूत वृक्षारोपण  

543

अर्जुन मेदनकर,आळंदी

वृक्षमित्र व अभिनेते सयाजी शिंदे यांचे हस्ते देहुत वृक्षारोपण करीत वृक्ष चळवळ बळकट करण्यास अभियान राबविण्यात आले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देहुला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील इंद्रायणी नदीलगतच्या रस्त्याचे कडेला वृक्षारोपण केले .
 या प्रसंगी देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे,रानजाई प्रकल्प प्रमुख  सोमनाथ आबा,पर्यावरण स्नेही धनंजय शेंडबाळे,लेखक अरविंद जगताप,आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भालेकर तसेच देहू संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते.तत्पूर्वी लेखक अरविंद जगताप यांना देहूत इंद्रायणी नदी घाटावर नदी प्रदूषण रोखण्यास होत असलेल्या कामाची माहिती रानजाई प्रकल्प प्रमुख सोमनाथ आबा यांनी दिली.  
 देहूत ३३५ वा श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त त्यांनी देहू मंदिरास भेट दिली. ते म्हणाले,गेल्या कित्येक वर्षाची पायी वारी दिंडीची परंपरा आहे. मात्र यावर्षी वारी नेहमीचे पद्धतीने होत नाही. तिचे स्वरूप बदलले आहे. या वर्षी वारकरी, भाविकांनी वारी झाडाचे सानिध्यात साजरी करावी.गावातील जुन्या वृक्षास प्रदक्षिणा करावी.त्यास मिठी मारावी.आपल्याला विठ्ठल तिथे भेटेल. तसेच आपापल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भगवान श्री पांडुरंगरायांकडे साकडॆ घातले. २०२० या वर्षीचे पायी वारी दिंडी पालखी सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येकाने एकेक वृक्ष लावावा. विठ्ठल तुमचे दारात आला आहे असे तुम्हाला वाटेल.या वर्षी वारीची आठवण म्हणून सगळ्या वारक-यांनी एकएक झाड आपल्या दारात,गावातील परिसरात लावण्याचे आवाहन अभिनेते शिंदे यांनी केले.
 देहूतील बल्लाळ वनात पुरातन विहीर असून या विहिरीचे पुननिर्माणकार्य हाती घेण्यात येणार असून विहीर बल्लाळ वन परिसर वृक्षारोपणाने बहरला असल्याचे सोमनाथ आबा यांनी सांगितले.