कॉन्ड्रोनेट किंवा ग्राफ्टनेट टेक्नीक कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीवर करता येऊ शकते
व्यक्तीच्या स्वताच्याच गुडघ्यातील कार्टिलेज चे टिशू (उती)काढून दुखापत झालेल्या भागात वापरण्यात येतात
पुणे प्रतिनिधी,
पुण्यातील २२ वर्षीय सतेज घरात काम करत असताना अचानक घसरून पडून जखमी झाला. त्यानंतर त्याला साईश्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ नीरज आडकर यांनी सतेजला तपासून त्याच्या गुडघ्याच्या हाडावर (डिसलोकेटेड पटेला) उपचार करून त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. अशा रुग्णामध्ये दुखणे लवकर आणि कायमचे बरे होते परंतु सतेजचे दुखणे कमी झाले नाही.
डॉक्टरांना सतेजला अंतर्गत जखम झाल्याची शंका आल्याने त्यांनी त्याच्या गुडघ्याचे एमआरआय केले. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, सतेजच्या गुडघ्याच्या खालच्या भागात जखम झाली आहे आणि अशा परिस्थिती मध्ये शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असते. सतेज याचे वय लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला जखमी कार्टिलेज रिपेअर करण्याचा सल्ला दिला परंतु सतेजची परीक्षा जवळ असल्याने सतेज व त्याचे पालक शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते.
सहसा अशा प्रकारच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी ऑटोलॉगस कॉड्रॉसाईट इम्प्लांटेशन (एसीआय) या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये दोन प्रक्रिया केल्या जातात त्यामुळे रुग्णास दोन शस्त्रक्रियेतून जावे लागते. डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया टाळण्याच्या हेतूने आधुनिक कॉन्ड्रोनेट टेक्नीक वापरण्याचे ठरविले व त्या संबंधी सतेज व त्यांच्या कुटुंबियांचे मार्गदर्शन देखील केले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया पुणे शहरात प्रथमच करण्यात आली आहे. यामध्ये डाव्या गुडघ्यावर कमी वजन पडणाऱ्या भागातील कार्टिलेज काढून उपचार करणाऱ्या भागावर लावण्यात आला. यामध्ये व्यक्तीच्या स्वताच्या प्लेट्लेट-रिच प्लास्मा(पीआरपी) वाढीसाठी सक्रीय होतात.
याविषयी अधिक माहिती देताना साईश्री हॉस्पिटलचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर म्हणाले की, कॉन्ड्रोनेट टेक्नीक ही कार्टिलेज दुखापत असलेल्या कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीवर करता येऊ शकते. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या गुडघ्यात कायम कोणतेच सांधे विषयक बदल होत नाहीत.
ते पुढे म्हणाले की, ही शस्त्रक्रिया सामान्य भूल देऊनच करण्यात आली तसेच सतेज यांना केवळ दोन दिवसात घरी सोडण्यात आले. यानंतर केवळ आठवडाभरात सतेज यांनी त्यांची परीक्षा देखील दिली व आता शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यानंतर ते पूर्णपणे सामान्य जीवन जगत आहे.
ही शस्त्रक्रिया करताना साईश्री हॉस्पिटल संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर, साईश्री हॉस्पिटलचे सिनियर ट्रामा आणि अॅक्सिडेंट सर्जन डॉ मंगेश पाटील, साईश्री हॉस्पिटलचे सांधेरोपणतज्ञ डॉ रवी केरहळकर आणि भूलतज्ञ डॉ तृप्ती पारे उपस्थित होते.