राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक विजेता दिग्दर्शक मकरंद मानेंचा नव्या चित्रपटाचा मानस !

687

पुणे प्रतिनिधी,

‘रिंगण’ हा मकरंद माने यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. या चित्रपटाला कोणताही पुरस्कार मिळेल याची कल्पनाही त्याने खरंतर केली नव्हती. मात्र चित्रपट तयार झाला की तो महोत्सवांमधून दाखवायचा, नंतर प्रदर्शित करायचा हे गणित आधीच त्यांनी ठरवलेलं होतं. पण थेट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सारं चित्रच पालटलं. त्यानंतर अनेक छोटे-मोठे निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मकरंद माने यांच्या संपर्कात आले. मात्र हा चित्रपट समजून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आणि असा निर्माता मिळेपर्यंत दिग्दर्शक मकरंद माने यांनी तब्बल दोन वर्षे वाट पाहिली. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रिंगण’, त्याच प्रमाणे ‘यंग्राड’ आणि रिंकू राजगुरू असेलेला “कागर” ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले. नाईन्टिनाईन प्रोडक्शन व बहुरूपी प्रोडक्शन च्या बॅनर खाली हा समंजस आणि सर्जनशील दिग्दर्शक आता एक नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.

दिग्दर्शक मकरंद माने यांच्या चित्रपटाचा प्रवास हा खरंतर थोडा वेगळा आणि अस्सल ग्रामीण आहे . ग्रामीण भागातील विषय ते अतिशय उत्तमरीत्या हाताळतात. त्यांचा पहिला चित्रपट ‘रिंगण’च्या कथेला पंढरपूरची पाश्र्वभूमी होती . पंढरपूरमधील वातावरण, वारी, विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे हजारो वारकरी, त्या निमित्ताने अगदी हळद-कुंकवापासून उभी राहिलेली बाजारपेठ असे अनेक तपशील देत अर्जुन-अभिमन्यू या बापलेकाचा संघर्ष या चित्रपटाद्वारे रंगवला गेला आणि या चित्रपटाने थेट राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यानंतर आलेला चित्रपट म्हणजे ‘यंग्राड’ , ‘यंग्राड’ हा बोली भाषेतील प्रचलित शब्द नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्यासोबत भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीसोबत सूत जुळवायला मदत करणे यासाठी चार मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या कुमारवयीन मुलांसमोर चुकीचे आदर्श असल्याने ते नेहमीच अडचणीत सापडतात. अशी ही कथा बॉलिवूड च्या अग्रगण्य आणि नावाजलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना आवडली आणि फँटम या त्यांच्या निर्मितीसंस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली . त्यानंतर आलेला त्यांचा तिसरा महत्वकांक्षी चित्रपट म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू असलेला कागर ! कोवळी पालवी म्हणजेच कागर. चित्रपटाला ग्रामीण राजकीय पार्श्वभूमी असून एक स्वप्न पाहणारी मुलगी पहिल्यांदा उंबरठय़ाबाहेर पडते, हा कागर क्षण आहे. शहरातल्या मुलींना उंबरठय़ाबाहेर पडून काम करणं सोपं असतं, पण गावाकडे ती स्थिती अजूनही बदललेली नाही आहे. गावाकडेही स्वातंत्र्य असलेतरी तिथे वेगळ्या प्रकारची बंधनं आहेत. त्याला राजकीय, सामाजिक संदर्भ लागू होतात. गावामध्ये कुठलीही वेगळी गोष्ट करायची असल्यास राजकीय, सामाजिक बंधनं पटकन झुगारता येत नाहीत. कारण आपल्या रोजच्या जगण्याशी ते निगडित असतं, त्याला बाजूला सारता येत नाही. अशा वातावरणात वेगळं काही करू पाहणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट दिग्दर्शकाने अधोरेखित केली . असे उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट देणारे दिग्दर्शक मकरंद माने बहुरूपी आणि नाइंटी नाइन च्या सहकार्याने आणखी एक दर्जेदार विषय लवकरचं घेऊन येणार आहेत .

या नवीन चित्रपटाबद्दल सांगताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने सांगतात ,’ माझे आणि शशांक शेंडे यांचे बहुरूपी प्रोडक्शन आणि विजय शिंदे यांचे नाईंटीनाईन प्रोडक्शन यांच्या सहकार्याने मी एक नवीन आणि वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे . व्यक्त होणे हे भावनेशी संबधित असत . माझ्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे विषय तुमच्या आमच्या घरातला अगदी जिव्हाळयाचा आहे एवढंच सध्या मी सांगू शकतो. बहुरूपी आणि नाइंटी नाइन च्या सहकार्याने जुन्या अबोल नात्याची नव्याने उलगडणाऱ्या प्रवासाची कथा मांडण्याचा प्रयत्न करत आहे .चित्रपटाच चित्रीकरण सुरु झालय लवकरच तो आपल्या समोर येईल . या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षक पसंती देतील ह्याची मला खात्री आहे . “