आयपीजीए, पल्स ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेड यांच्या वतीने हरभरा व मसूर डाळीसंदर्भात वेबिनार

327

• वेबिनारमध्ये हरभरा व मसूर यांवरील चर्चेवर भर दिला जाणार असून यात भारत व ऑस्ट्रेलियामधील उत्पादन, मागणी-पुरवठ्याची स्थिती आदींचा समावेश असेल
• पॅनलवर या श्रेत्रातील चार तज्ज्ञ असतील- यापैकी दोन भारतातील तर दोन ऑस्ट्रेलियातील असतील
• ऑस्ट्रेलियन सरकारच्या ऑस्ट्रेलिया इंडिया बिझनेस एक्स्चेंज (एआयबीएक्स) कार्यक्रमाचा भाग म्हणून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे
मे, २०२१: इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशन (आयपीजीए) या भारतातील डाळींच्या व्यापार व उद्योगांची मध्यवर्ती संस्थेने ‘द आयजीपीए नॉलेज सीरिज’च्या अंतर्गत, गुरुवारी, १३ मे २०२१ रोजी, दुपारी ३.३० वाजता, हरभरा व मसुरावर वेबिनार आयोजित केला आहे. आयपीजीए पल्स ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेड यांच्यासह हा वेबिनार घेत आहे.
हरभरा आणि मसूर या दोन विशिष्ट डाळींच्या भारत व ऑस्ट्रेलियातील पिकाच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती सर्वांपुढे सादर करण्याचे उद्दिष्ट या वेबिनारपुढे आहे. यामध्ये मागील हंगामातील उत्पादन, मागणी-पुरवठा स्थिती, अपेक्षित व्यापाराचे प्रमाण आणि दर यांबरोबरच सध्याच्या कोविड-१९ साथीचा उत्पादन व व्यापारावर झालेला परिणाम या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
वेबिनारमध्ये चार वक्त्यांमध्ये पॅनल चर्चा होईल, यातील दोन वक्ते भारतातील तर दोन ऑस्ट्रेलियातील असतील. भारताचे प्रतिनिधित्व एसार्को एग्झिमचे व्यवस्थापकीय संचालक तसेच आयपीजीएच्या पूर्व विभागाचे निमंत्रक श्री. अनुराग तुलशन आणि जीजीएल रिसर्चचे व्यवस्थापकीय सहयोगी (पार्टनर) श्री. नीरव देसाई करतील. ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व पल्स ऑस्ट्रेलियाचे संचालक श्री. निक पौटनी आणि विल्सन इंटरनॅशनल ट्रेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पीटर विल्सन करतील.
श्री. तुलशन आणि श्री. पौटनी मसुराबद्दल बोलतील, तर श्री. देसाई आणि श्री. विल्सन देशी व काबुली हरभ-याबद्दल (चणे) बोलतील. वेबिनारचे प्रास्ताविक व्हिटेरा इंडियाच्या डाळी विभागाचे प्रमुख श्री. सौरभ भारतीया करतील आणि समारोप ऑस्ट्रेडचे वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त श्री. स्टुअर्ट रीस करतील.
आयजीपीएचे संस्थापक संचालक श्री. प्रवीण डोंगरे म्हणाले, “भारत सरकारने नुकतीच कृषीक्षेत्रात क्रांतीकारक सुधारणांची घोषणा केली आहे आणि यामुळे कृषी-संरचना क्षेत्रातील विशाल गुंतवणुकींसाठी हे क्षेत्र खुले होईल, असे आम्हाला वाटते. भारतातील कृषी-संरचना क्षेत्रात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. यांमध्ये हंगामोत्तर व्यवस्थापन, गोदामे, लॉजिस्टिक्स आदींचा समावेश होतो. ऑस्ट्रिलियन कंपन्या या सुधारणांचा लाभ घेऊन भारतातील पुरवठा साखळी क्षेत्रात गुंतवणूक करतील अशी आशा आम्हाला वाटते. आम्ही भारतीय कृषी-संरचना क्षेत्रातील गुंतवणुकींचा मार्ग सुलभ करण्याच्या दृष्टीने पल्स ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेड यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
आयपीजीएचे अध्यक्ष श्री. जितू भेडा या वेबिनारबद्दल म्हणाले, “जग अद्याप कोविड साथीशी झगडत असताना, या टप्प्यावर, डाळींची पिके व एकंदर स्थिती समजून घेणे अनेक संबंधितांसाठी निर्णायकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. भारतातील डाळींच्या क्षेत्राला लाभ मिळावा या दृष्टीने जगातील सर्व आघाडीच्या डाळींसंदर्भातील संघटनांशी संपर्क प्रस्थापित करण्यास तसेच तो वाढवण्यास आम्ही उत्सुक आहोत. आयपीजीएमध्ये आम्हाला याचे महत्त्व केवळ देशांतर्गत व्यापाराच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर आयात-निर्यातीच्या दृष्टिकोनातून पटलेले आहे. आम्ही पल्स ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेड यांच्यासह आयोजित केलेला हा वेबिनार सर्व संबंधितांना या दोन्ही उत्पादनांबाबत सखोल माहिती देईल व त्यांना माहितीपूर्ण व्यापार निर्णय करण्यात मदत करेल असा आत्मविश्वास मला वाटतो.”
श्री. अनुराग तुलशन त्यांच्या या वेबिनारमधील भूमिकेविषयी म्हणाले, “आयपीजीए नॉलेज सीरीज जगभरातील ८०० हून अधिक उपस्थितांसह खूपच यशस्वी ठरलेली आहे. आयपीजीएसोबत हा वेबिनार आयोजित करण्यासाठी एकत्र आल्याबद्दल मी ऑस्ट्रेड व पल्स ऑस्ट्रेलिया यांची प्रशंसा करतो. मी या वेबिनारमध्ये गेल्या हंगामातील मसूर उत्पादनाबद्दल ताजी माहिती देणार आहे, एकंदर मागणी-पुरवठा व दरांबद्दलची स्थिती मांडणार आहे तसेच मसुराच्या पुरवठा व मागणीवर कोविड-१९ साथीचा काय परिणाम झाला आहे, याबद्दलही बोलणार आहे.”
श्री. नीरव देसाई वेबिनारमधील त्यांच्या भूमिकेविषयी म्हणाले, “आयपीजीए गेल्या वर्षापासून यशस्वीरित्या आयपीजीए नॉलेज सीरिजचे आयोजन करत आहे. त्यापाठोपाठ त्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये नॅशनल पल्स सेमिनारही तेवढाच यशस्वीरित्या घेतला. हरभरा व मसूर यांबद्दल वेबिनार घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व भारतातील शिखर व्यापार संघटनांनी एकत्र येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. मी देशी व काबुली हरभरा (चणे) या पिकाबद्दलची एकंदर माहिती सादर करणार आहे. यात गेल्या हंगामातील देशी व काबुली चण्याचे उत्पादन, एकंदर मागणी-पुरवठा व दरविषयक स्थिती तसेच या दोन्ही डाळींच्या मागणी तसेच पुरवठ्यावर कोविड-१९ साथीचा होत असलेला परिणाम यांचा समावेश होतो.”
विल्सन इंटरनॅशनल ट्रेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पीटर विल्सन या वेबिनारमधील त्यांच्या भूमिकेविषयी म्हणाले, “हरभ-याच्या अपेक्षित लागवड क्षेत्राविषयी (आणि अपेक्षित उत्पादनाविषयी) बोलण्यासोबतच, ऑस्ट्रेलियन उत्पादकांसाठी देशी हरभरा हे केवळ “आळीपाळीने” घेण्याचे (रोटेशनल) पीक का नाही हे स्पष्ट करणार आहे. जगाच्या स्पर्धेत टिकू शकेल असा सर्वोत्तम दर्जाचा देशी हरभरा कसा पिकवायचा हे ऑस्ट्रेलियातील शेतक-यांना माहीत आहे आणि त्यांच्या कृषीव्यवस्थेतील कामाचा तो अविभाज्य भाग आहे. ऑस्ट्रेलियातील उत्पादक आणि निर्यातदार भारताशी आयातीचे व्यवहार सुरू करण्यास तयार आहेत तसेच भारताच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे उत्पादन घेणा-या अन्य विस्तृत प्रदेशांशीही व्यवहारास तयार आहेत या मुद्दयालाही मी स्पर्श करणार आहे.”
पल्स ऑस्ट्रेलियाचे संचालक श्री. निक पौटनी वेबिनारमधील त्यांच्या भूमिकेविषयी म्हणाले, “मी गेल्या हंगामातील मसूर उत्पादन आणि त्या संदर्भाने नवीन हंगामाच्या लागवडीचे उद्दिष्ट तसेच डाळींच्या दरांबाबतचे शेतक-यांचे (लागवड करणा-यांचे) विचार आणि आळीपाळीने लावली जाणारी स्पर्धात्मक पिके या विषयांवर बोलणार आहे. व्यापाराची आकडेवारीही मी सादर करेन. तसेच दरअपेक्षांवरील संभाव्य प्रभाव तसेच उत्पादनावरील विचार करण्याजोगे प्रभाव व अलीकडील प्रवाह यांवरही प्रकाश टाकणार आहे.”
ऑस्ट्रेडचे वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त श्री. स्टुअर्ट रीस या वेबिनारबद्दल म्हणाले, “उच्च दर्जाच्या डाळींचा (हरभरा, मूग, मसूर, वाटाणा) खात्रीशीर निर्यातदार म्हणून भारतातील मागणी व पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी मदत करण्याची क्षमता ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतातील उत्पादन व धोरणांची हंगामी अंगे ऑस्ट्रेलियन शेतक-यांना जेवढी अधिक समजतील आणि उमगतील, तेवढे त्यांना स्वत:चे लागवडीचे निर्णय चांगल्या पद्धतीने करता येतील. त्याचप्रमाणे भारताला ऑस्ट्रेलियन पिकांबद्दल जेवढी अधिक माहिती मिळेल, तेवढे आयातीचे निर्णय चांगल्या पद्धतीने नियोजित केले जाऊ शकतील. ऑस्ट्रेडने या वेबिनारच्या आयोजनात तसेच नियमित ज्ञान आदानप्रदानात मदत करण्यासाठी आयपीजीए आणि पल्स ऑस्ट्रेलिया यांच्याशी सहयोग केला आहे. यामुळे आडाखे बांधण्याची क्षमता वाढेल आणि याचा फायदा भारतीय बाजारपेठ व ऑस्ट्रेलियन उत्पादक दोहोंना होईल.”
पल्स ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्ष श्रीमती जॉर्जी अले या वेबिनारबद्दल म्हणाल्या, “ऑस्ट्रेलियन डाळ उद्योगामध्ये भारतातील डाळ उद्योगासोबत काम करून उच्च दर्जाच्या डाळींचा पुरवठा करण्याची दीर्घ व अभिमानास्पद परंपरा आहे. दोहोंमध्ये दीर्घकालीन तसेच विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. भारत सध्या अत्यंत कठीण काळातून जात असताना, कोविड साथीमुळे पुरवठा साखळीचे नुकसान होत असल्याने जो काही तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, तो भरून काढण्यात मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन डाळ उद्योग तयार आहे. हा वेबिनार म्हणजे दोन देशांतील नात्याचे ठोस प्रकटीकरण आहे आणि भारतीय बाजारपेठेला ऑस्ट्रेलियाच्या डाळ लागवड उद्दिष्टांबद्दल माहिती देण्यासाठी अत्यंत आदर्श वेळी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतातील रबी हंगामाची तसेच खरीप पिकाबद्दलच्या अंदाजांची ताजी माहिती ऑस्ट्रेलियन बाजारपेठेला देण्याचे कामही यातून साध्य होणार आहे.”
आयपीजीए नॉलेज सीरिजमध्ये सरकार, बाजारपेठ आणि उद्योगातील कुशल क्षेत्र तज्ज्ञांचा समावेश केला जातो. हे तज्ज्ञ भारतातील व जगभरातील डाळींच्या क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात व नवीन शोध घेतात.
या वेबिनारचे आयोजन ऑस्ट्रेलियन सरकारच्या ऑस्ट्रेलिया इंडिया बिझनेस एक्स्चेंज (एआयबीएक्स) कार्यक्रमाचा भाग म्हणून केले जात आहे. याचे उद्दिष्ट दोन्ही बाजूंनी उद्योग साक्षरता वाढवणे व भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान व्यावसायिक भागीदारी वाढवणे हे आहे.
या वेबिनारसाठी नोंदणी व उपस्थिती नि:शुल्क आहे. इच्छुकांना पुढील लिंकवर नोंदणी करता येईल- https://forms.gle/ykdedKtWrTozQ8VBA.
आयपीजीए विषयी:
भारतातील डाळी आणि धान्य व्यापार व तत्संबंधी उद्योगांची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) ४०० हून अधिक प्रत्‍यक्ष व अप्रत्यक्ष सभासद आहेत, ज्यांत व्यक्ती, कॉर्पोरेट्स तसेच स्थानिक डाळ व्यापारी आणि प्रोसेसर्स संघटनांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून ही संघटना डाळींचे उत्पादन, प्रक्रिया, धान्यसाठवणूक आणि आयात उद्योग अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा भाग असलेल्या १०,००० लाभार्थींशी जोडली गेली आहे.
भारतीय डाळी आणि धान्य उद्योग व व्यापार जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम बनावा, व हे ध्येय साध्य करताना भारताच्या अन्न व पोषण सुरक्षेलाही बळ मिळावे हे आयपीजीएचे लक्ष्य आहे. आयपीजीए स्थानिक कृषी-व्यापार क्षेत्रामध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्याची व भारतीय बाजारपेठेत सहभागी घटकांमध्ये तसेच भारत व त्यांच्या परदेशातील सहका-यांमध्ये सुदृढ नातेसंबंधांची जोपासना करण्यासाठी जागतिक स्तरावर अधिक सक्रिय भूमिका निभावण्याची जबाबदारी आयपीजीएने आपल्या शिरावर घेतली आहे.