ओढ्यावरील अतिक्रमणामुळे उंड्रीतील सोसायटीत पाणी

406

कोंढवा प्रतिनिधी , 

पुणे मनपाच्या गलथान कारभारामुळे आणि नालेसाफाई व्यवस्थित न केल्यामुळे उंड्री परिसरातील कडनगर येथील हिल्स अँड डील्स व गगन इस्ट्रा सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात गुडगाभर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उंड्री-पिसोळी परीरातील सर्व नैसर्गिक ओढे नाले पावसाळ्यापूर्वी साफ-सफाई करण्यासाठी राजेंद्र भिंताडे यांनी पालिकेच्या ड्रेनेज आणि मल निःसारण अधिकाऱ्याची भेट घेऊन निवेदने दिली होती. तसेच ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण केले होते ते त्वरित काढण्याचे त्यांना कळविले होते. परंतु नेहमीच येतो पावसाळा आणि नेहमीच येतो पूर या भावनेतून पालिकेच्या अधिकाऱयांनी कामे अर्धवट ठेवल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये आणि सोसायटी परिसरात पाणी शिरले यामुळे नागरिकांचे जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. वास्तविक उंड्रीतील कडनगर परिसरात नैसर्गिक ओढ्या-नाल्यावर अतिक्रमण करून त्याचा मार्ग बदलला असून त्याला वळण दिले आहे , जो पूर्वी सरळ असल्याने तेथे कधीहि पाणी साचले नाही असे जेष्ठ नागरिक सांगत आहेत. त्यामुळे येथील परिसरातील सर्व नाल्यावरील व ओढयांवरील अतिक्रमण त्वरित काढून हा नाला सरळ करून पूर्वीप्रमाणेच सरळ करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा , नाहीतर पालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील भिंताडे यांनी दिला असून कडनगर चौकात कळवट टाकण्याची मागणीही त्यांनी पालिकेकडे केली आहे. याप्रसंगी दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले आदी उपस्थित होते.