देशी दारूच्या अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड

386

देशी दारूचा 4 लाख 74 हजारांचा माल जप्त करून 7 गुन्हे दाखल

गिरीश भोपी,अलिबाग,जि.रायगड,- पेण तालुक्यातील रावे या गावी देशी दारू विक्री प्रकरणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मोटारसायकलसह 39 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला तर 4 लाख 74 हजार 720 रुपयांचा मुद्देमालही जप्त करून नष्ट केला. या प्रकरणी एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुरुड विभागातील राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक श्री.आनंद पवार, दुय्यम निरीक्षक अंकुश बुरकुल, निरीक्षक श्री.गोगावले, खालापूर निरीक्षक श्री.चाटे, पनवेल शहर दुय्यम निरीक्षक श्री.माझगावकर, दुय्यम निरीक्षक श्री.मानकर, सहाय्यक निरीक्षक श्री.मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती नरहरी व जवान निमेष नाईक, अपर्णा पोकळे, श्री.पालवे, संदीप पाटील, महिला जवान रमा कांबळे, वाहनचालक श्री.हाके, श्री.कदम यांनी पेण तालुक्यातील रावे या गावात 500 लिटर क्षमतेचे भट्टीवरील 9 लोखंडी बॉयलर, 100 लिटरच्या 157 व 200 लिटरच्या 27 ड्रम मधील एकूण 19 हजार 50 लिटर रसायन व इतर साहित्य जप्त करून नष्ट केले.
रायगड राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री.आनंद पवार यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने ही सलग तिसरी धडक यशस्वी कारवाई केली आहे.
00000