कालिदास दिनानिमित्त ‘स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक’मध्ये ‘मी…कालिदास’

517

‘मी… कालिदास’ ऑडिओबुकला लोककप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांचा आवाज!

आषाढस्य प्रथम दिवसे… म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो याचे कारण कवि कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. हा दिवस रविवारी ११ जुलै रोजी येत आहे म्हणून ‘स्टोरीटेल मराठी’ने या निमित्ताने ‘मी.. कालिदास’ हि डॉ. मंगला मिरासदार लिखित चरित्रात्मक कादंबरी ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित करत आहे. लोककप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या गोड आवाजात ‘मी… कालिदास’ ‘स्टोरीटेल मराठीच्या ऑडिओबुक’मध्ये ऐकणं ही रसिकश्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी आहे.
भारतभूमीच्या इतिहासात रसिकांच्या हृदयावर विराजमान झालेले एक अनोखे व्यक्तिमत्त्व म्हणजे कालिदास. काव्य, नाट्य, शृंगार आदी नऊ रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती निर्माण करणारा कालिदास हा सदैव सर्व रसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्याचे जीवन समजून घेणे सोपे नसले तरी मंगला मिरासदार यांनी लिहिलेल्या ‘मी…कालिदास’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांमधून कालिदासाच्या जीवनप्रवासाची ओळख करुन घेण्याची संधी ‘स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक’मध्ये रसिक श्रोत्यांना लाभली आहे. कालिदासाबद्दल सांगितल्या जाणार्‍या आख्यायिकांमधून, कालिमातेने प्रसन्न होऊन त्याला प्रतिभेच्या दिव्य गुणाचे वरदान दिले, असे म्हटले जात असले तरी लेखिकेने कालिदासाच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. कालिदासाने अवगत केलेल्या काव्य व शास्त्र या कला आणि त्यातील निपुणता त्याने किती कष्टाने साध्य केली हे वाचकांसमोर आणले आहे.
कालिदास हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. कालिदास कधी होऊन गेला हे केवळ त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतीच्या अभ्यासाने अंदाज बांधून ठरवावे लागते. असे असले तरी कालिदासाच्या काव्य – नाट्य – कलाकृती आजही मनाला भुरळ घालतात, अभ्यासल्या जातात. कालिदासाचा मेघदूत तरुण तरुणींना आजही स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासणे सोपे नाही. मंगला मिरासदार यांनी आपल्या लेखनशैलीने सर्वांना समजणाऱ्या कादंबरीच्या परिभाषेत तो प्रस्तुत केला आहे. त्यामुळे कालिदासाचे जीवन स्टोरीटेल मराठीच्या ऑडिओबुकमध्ये ऐकताना श्रोतेही खुलून जातात.
‘मी… कालिदास’ या अत्यंत वेगळ्या आणि वैशिट्यपूर्ण कादंबरीच्या लेखिका डॉ. मंगला मिरासदार पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत विषयाच्या प्राध्यापक होत्या. कौटिलिय अर्थशास्त्राच्या तज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी ‘मी… कालिदास’ सोबतच ‘श्री सत्यसाई’, ‘घोषवती’, ‘राजमुद्रा अर्थात मुद्राक्षसम’, ‘कथा सुभाषितांच्या’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र – एक अध्ययन’ तसेच इंग्रजीतील ‘द पॉलिटिकल आयडीयाज इन द पंचमहाकाव्यज’ अश्या विविध विषयांवरील ग्रंथ निर्मिती केली आहे.
११ जुलैला ‘कालिदास दिवसाचे औचित्य साधून कालिदासांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते या चरित्ररूपी कादंबरीचे ‘स्टोरीटेल मराठी’वर निश्चितच स्वागत करतील. ‘मी… कालिदास’ ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठीसह सर्व ११ प्रादेशिक भाषेमधील पुस्तके योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.