स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ची घोषणा

370

‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह रसिकांच्या भेटीला आला आहे. नेहमीच स्वत:समोर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवण्याची आव्हानं उभी करत ती यशस्वीपणे पार करणारा सुजय आता इतिहासाची पानं उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करत महाराष्ट्रातील तमाम रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुजयनं ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.

अमृता अरूण राव यांची निर्मिती असलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचं आहे. याच पुण्यपर्वाचं औचित्य साधत ‘श्यामची आई’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयनं घेतला आहे. या चित्रपटाची बरीच वैशिष्ट्ये असतील. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असेल. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीतील १९१२ ते १९४७ पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबतची कोणतीही माहिती सध्या तरी रिव्हील करण्यात आलेली नाही. तूर्तास केवळ ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्याचं सुजयनं जाहिर केलं आहे.

‘श्यामची आई’ हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. अद्याप या चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नसून, ऑडीशनच्या माध्यमातून सर्व कलाकारांची निवड केली जाणार आहे. या चित्रपटाचा जुन्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कादंबरीतील बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत, ज्या आचार्य अत्रेंच्या ‘श्यामची आई’ चित्रपटात करण्यात आल्या नव्हत्या. ‘शाळा’ या पहिल्या चित्रपटापासून सुजयच्या मनात ‘श्यामची आई’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बनवण्याचा विचार घोळत होता. इतर चित्रपटांसाठी काम करताना दुसरीकडे सुजयचा या चित्रपटावर रिसर्चही सुरू होता. यासाठी आपण पाच-सहा वर्षे मेहनत घेतली असून, ‘श्यामची आई’ बनवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचं सुजयचं म्हणणं आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून प्रेक्षकांचा नॅास्टेल्जिया जागृत करत त्यांना १९ व्या शतकात नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.