उंड्रीत रूढी परंपरेला फाटा देत दोन मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला मुखाग्नी

451

प्रसंग पाहून नागरिकांचे डोळे पाणावले

अनिल चौधरी, पुणे

मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो , मात्र उंड्री येथील प्रसिद्ध महिला उद्योजक, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, शारदा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा तसेच उंड्री गावच्या प्रथम महिला सरपंच शारदा मोहनराव होले यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

वंशाचा दिवा मुलगाच हा समज दूर करत या दोन मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या दोन लेकींनी भासू दिली नाही. या दु:खद प्रसंग हजारो ग्रामस्थानी तसेच समाजातील राजकीय नेते, व्यावसायिक, उद्योजक आणि इतर नागरिकांनी अनुभवला.

कै. शारदा होले यांनी अनेक महिलांना महिला उद्योग केंद्रातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पतसंस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक नागरिकांना स्वयंरोजगारासाठी तसेच इतर कारणांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले त्यातील आज काही प्रतिष्ठित उद्योजक आहेत. त्यांनी उंड्री परिसरात राजकारण न करता एक सामाजिक आणि आपल्या परिवाराप्रामणे नागरिकांची सेवा केली आहे. आज त्यांचे नाव उंड्री परिसरात अभिमानाने घेतले जाते . त्यांच्या आकस्मिक जाण्याने आपल्याला मोठे दु:ख झाल्याचे जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मा. राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जि.प.अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेनेचे बाळासाहेब टकले, काँग्रेसचे संदीप बांदल, भाजपाचे युवा नेते राजेंद्र भिंताडे , राष्ट्रवादीचे निवृत्ती बांदल, मछिंद्र दगडे, यांनी श्रद्धांजली वाहिल्या.
यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कै.शारदा होले यांच्या पश्चात पती, दोन मुली,जावई, दीर, जावा, पुतणे, नातू , आदी मोठा परिवार आहे.