महिला पोलीस कर्मचारी यांना दमदाटी करणाऱ्यावर कारवाई करावी; क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन

549

गिरीश भोपी,

पनवेल शहरातील भाजी मार्केट परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे नो पार्किंगमध्ये असणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाहतूक महिला पोलिसांनी जॅमर लावला. यावेळी कारचालकाने माझ्या कारला जॅमर लावायची हिम्मत झालीच कशी? अशी भाषा वापरीत टोव्हींग व्हॅनवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली, अखेर त्या चारचाकी वाहन चालकाला पोलिसी खाक्या दाखवताच त्या कार चालकाने तेथून पळ काढला. याबाबत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रूपालिताई शिंदे यांनी अधिक माहिती घेतली असता दमदाटी करणारा व्यक्ती हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता असून त्याचा गर्व त्या व्यक्तीला असल्याने त्याने हा प्रकार केला. हि घटना मंगळवारी ता. 5 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरात घडली. पनवेल शहरात काही ठिकाणी नो पार्किंग झोन आहे. नो पार्किंगमध्ये गाड्या लावणार्‍यांवर कारवाई करण्यात येते. त्यासाठी पनवेल शहर वाहतूक नियंत्रण शाखेची एक क्रेन रस्त्यावर सतत धावत असते. नो पार्किंगमध्ये असणारी वाहने ही क्रेन उचलून छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील वाहतूक नियंत्रण शाखेत आणते. मंगळवारी नेहमीप्रमाणे टोव्हींग व्हॅन पनवेल शहरातून चालली होती. त्यावेळी महिला वाहतूक पोलीस साधना पवार, व संजय मोरे हे आपले कर्त्यव्य बजावत होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पनवेल शहरातील भाजी मार्केट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी नो पार्किंगमध्ये असलेल्या कारला महिला वाहतूक पोलीस साधना पवार यांनी जॅमर लावला. मात्र आपल्या कारला जॅमर लावला असल्याचे त्या वाहनचालकाच्या लक्षात येताच त्याला संताप झाला व पोलीस चौकीजवळ येत माझ्या कारला जॅमर लावायची हिम्मत झालीच कशी? अशा अर्वाच्य भाषेचा वापर करीत साधना पवार यांना शिवीगाळ करीत हुज्जत घातली. मात्र पवार यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा दाखल करण्याआधीच त्या वाहनचालकाने तिथून पळ काढला. मात्र या घडलेल्या घटनेबाबत वाहतूक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली तसेच राजकीय पक्षाच्या जोरावर जर का महिला पोलीस अथवा कोणत्याही पोलिसांना जर का अशी धमकी देत असतील तर हे महिलांच्या हिताचे नाही पनवेलमधील टोचन व्हॅनवर कार्यरत महिला पोलीस कर्मचारी यांना दमदाटी करणाऱ्या राजकीय व्यक्तीचा शोध घेऊन तात्काळ सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी व पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे परिमंडळ – 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांना भेटून पत्राद्वारे केली आहे. यावेळी अध्यक्षा रूपालिताई शिंदे, उपाध्यक्षा नंदिनी गुप्ता, पेठगाव विभागीय अध्यक्षा रेश्मा सानप, सदस्या इंदू बगाटे,जरीना शेख, आसमा शेख, राशिदा शेख, विद्या जाधव, जयश्री कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान या व्यक्तीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही या व्यक्तीचा शोध घेऊन आमच्या पद्धतीने त्याचा समाचार घेऊ असे अध्यक्षा सौ.रूपालिताई शिंदे यांनि सांगितले आहे.