नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण

1335

पुणे, दिनांक 3- भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण राज्‍याचे वित्‍त आणि  नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्ते झाले.  यावेळी पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, आमदार विजय काळे, सिम्‍बॉयसिसचे डॉ. शां.ब. मुजूमदार, नगरसेवक आदित्‍य माळवे, मुख्‍य वन संरक्षक विवेक खांडेकर, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्‍मी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            नियोजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनांची आवश्‍यकता प्रतिपादन करुन वृक्षलागवडीचे महत्‍त्‍व विशद केले.  मानव हा बुध्‍दीमान प्राणी असला तरी त्‍याने निसर्गाचा -हास करुन स्‍वत:च्‍या पायावर कु-हाड मारुन घेतली आहे. नदीला माता मानणा-या मानवाने  नद्यांचेही  शोषण केले आहे. पर्यावरणाच्‍या संरक्षणाची चावी वृक्षांमध्‍ये असल्‍याने राज्‍यात वृक्षलागवडीची चळवळ सुरु करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

 राज्यातील पर्यावरणप्रेमी जनता, स्‍वयंसेवी संस्‍था,  शासकीय विभाग या सर्वांच्‍या सहकार्याने वृक्षलागवड मोहीम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला.

            आमदार विजय काळे यांनी भांबुर्डा वनउद्यानाचे वैशिष्‍ट्य सांगितले. ते म्‍हणाले,  भांबुर्डा टेकडीच्‍या पायथ्‍याशी 14 एकरात साकारले असून निसर्गाचे विविध पैलू उलगडणारे माहिती केंद्र म्‍हणून भांबुर्डा वन उद्यान विकसित करण्‍यात आले आहे. आयुष वन, दुर्मिळवनस्‍पती, गणेशवन, सुगंधीवन, नवग्रह, पंचवटी, औषधी वन,बांबूवन, स्‍मृतिवन आदींचा समावेश आहे. जैव विविधतेतील माहितीचा खजिना उलगडणारे निसर्ग परिचय केंद्र म्‍हणून ओळख निर्माण होईल. पर्यावरणाच्‍या गोष्‍टी समजून घेण्‍यासाठी, त्‍याचे सादरीकरण करण्‍यासाठी ओपन थिएटर केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

            मुख्‍य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी प्रास्‍ताविक केले.  सुधीर मुनगंटीवार हे हरित क्रांतीचे नवे नायक असून त्‍यांनी  ग्‍लोबल वार्मिंग आणि वाढत्‍या प्रदूषणाची समस्‍या ओळखून वृक्षलागवडीची मोहीम होती घेतली असल्‍याचे सांगितले. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, नगरसेवक आदित्‍य माळवे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात वृक्षलागवडीमध्‍ये योगदान देणा-या स्‍वयंसेवी संस्‍था, अधिका-यांचा गौरव करण्‍यात आला.