पुणेकरांनी अनुभवले “तंत्र-विद्या चित्रकला” प्रदर्शन…

738

पुणे प्रतिनिधी,

 भारतीय परंपरेनुसार कोणतेही पद्धतशीर पुस्तक, सिद्धांत, कार्यपद्धती किंवा साधनपद्धतीस तंत्र प्रणाली म्हणतात. तंत्र अभ्यासाचा अर्थ “खोल किंवा खोल ध्यान” होय. तंत्र हे वेदोत्तर नंतरचे कार्य मानले जाते जे पहिल्या सहस्राब्दीच्या मध्यभागी फुलले. याच तंत्राच्या आधारावर रेखटलेली गुढ चित्रे चित्रकार अनंथ शास्त्री यांनी रेखाटली. यामध्ये कालीमाता, आद्य शंकराचार्य तसेच यंत्र-तंत्र त्याचे गुढ अर्थ उलगडण्याचा प्रयत्न शास्त्री यांनी केला आहे. मुळचे बेंगलोर येथील शास्त्री यांचे तीन दिवसीय तांत्रिक चित्रप्रदर्शन ‘तंत्र-विद्या चित्रकला’ नुकतेच पुण्यातील रवि परांजपे आर्ट गॅलरी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथे पार पडले. या चित्रकला प्रदर्शनाचे प्रायोजक कन्नड आणि संस्कृती विभाग, बंगलोर होते.

चित्रकार अनंथ शास्त्री म्हणाले, तांत्रिक विद्या हे गुरुशिष्य परंपरेतून शिकले अथवा शिकवले जाते. तंत्र परंपरा हिंदू, बौद्ध आणि जैन तत्वज्ञानामध्ये आढळतात. साहित्यिक स्वरुपात पुराणांमध्ये मध्ययुगीन काळातील तात्विक आणि धार्मिक कार्ये महत्वाची मानली जातात, त्याचप्रमाणे तंत्रांत प्राचीन कथा इत्यादी असतात. त्याच्या सामग्रीच्या बाबतीत यास धर्म, तत्त्वज्ञान, निर्मिती, प्राचीन विज्ञान इत्यादींचा विश्वकोश असेही म्हटले जाऊ शकते. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थ “तनोति त्रायति तन्त्र:” याचा अर्थ – ताणणे, विस्तार करणे, फैलावणे, म्हणजे तंत्र असल्याचे अनंथ शास्त्री म्हणाले. असे तंत्र-विद्या क्षेत्रातील चित्र रेखाटताना वेगवेगळ्या संदर्भाचा आधार घ्यावा लागला. त्या कथा चित्रस्वरुपात रेखाटून पुणेकरांना सादर करताना प्रचंड आनंद झाल्याची भावना शास्त्री यांनी व्यक्त केली.