धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकास लाच घेताना अटक

2103

अनिल चौधरी , पुणे

नांदेड धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक गंगाधरपंत धोंडीबाराव नांदेडकर, वय ४७ वर्ष, यांना एका पुजाऱ्याकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आले आहे.                                                                      याबाबत अधिक माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणाले कि, तक्रारदार हे धार्मिक विधी करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याविरुद्ध मा.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर नांदेड  यांच्या आदेशानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड कार्यालय येथे चौकशी चालू आहे. व त्याचा चौकशी अवहाल न्यायालयात सादर करावयाचा आहे. हि चौकशी नांदेड धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक गंगाधरपंत धोंडीबाराव नांदेडकर यांच्याकडे आहे. तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल अहवाल सादर करणेसाठी निरीक्षक गंगाधरपंत नांदेडकर यांनी १५,००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती त्यांच्यामध्ये १०,००० हजार रुपये लाच देण्याचे ठरले.परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याशी संपर्क करून तक्रार दाखल केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता ती सत्य असल्याचे समजले.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड, वर्ग-3, नांदेड येथील परिसरात सापळा लावला. त्यानुसार तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना निरीक्षक गंगाधरपंत धोंडीबाराव नांदेडकर यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

     कुठलाही लोकसेवक लाचेची मागणी करत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.