महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाच घेताना रंगेहात पकडले

827

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

बुलडाणा येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता अनंत प्रल्हाद वराडे वय ४०, महावितरण केंद्र वडनेर भोलाजी ता. नांदुरा, जिल्हा बुलडाणा व कंत्राटी कर्मचारी प्रवीण रामदास चिमणकर वय २३ वर्षे, रा. मु.पो.चांदूर, बिस्वा, ता.नांदुरा यांना ५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे अभियंता अनंत वराडे आणि कंत्राटी कामगार प्रवीण चिमणकर यांनी तक्रारदार यांचे विद्युत मीटर नादुररुस्त आहे असे सांगितले. त्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. पण तक्रारदार यांची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा कार्यालयाशी संपर्क करून तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची एसीबीने शहानिशी केली असता त्यात सत्यता असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळ्याचे आयोजन केले. त्यानुसार महावितरणचे अभियंता अनंत वराडे यांच्या वतीने कंत्राटी कर्मचारी प्रवीण चिमणकर याने पंचायत समिती कार्यालयासमोरील जय गजानन हॉटेल येथे ५००० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा पथकाने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडले.