दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतुकीवर उपाययोजना करा -जिल्‍हाधिकारी राम

416

पुणे,- दौंड तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उत्‍खनन व वाहतूक रोखण्‍यासाठी महसूल, पोलिस, उप प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या अधिका-यांनी उपाययोजना कराव्‍यात, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील त्‍यांच्‍या दालनात अवैध गौणखनिज वाहतूक तालुका दौंड बाबत जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, बारामतीचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक जयवंत मिना, दौंड, पुरंदर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंडचे तहसीलदार बाळाजी सोमवंशी, जिल्‍हा खनिज कर्म अधिकारी संजय बामने आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले की, तहसील कार्यालयाच्‍या ताब्‍यात असणा-या 57 वाहनधारकाकडून येणारा दंड न भरल्‍यास जुलै अखेर त्‍या वाहनांचा लिलाव करुन दंडाची रक्‍कम वसूल करण्‍यात यावी. उजनी जलाशयाच्‍या अखत्‍यारित अकरा गावांमधील अनधिकृत वाळू उत्‍खनन होत असल्‍यास संबंधित जलसंपदा विभागास जबाबदार धरण्‍यात यावे. भिमा नदीपात्रालगतच्‍या लाणगाव, वाटलूज येथील वन विभागाच्‍या मालकीच्‍या क्षेत्रामध्‍ये अनधिकृत वाळू साठे आढळून आल्‍यास त्‍याबाबत वन विभागाने कारवाई करावी. तसेच महसूल, पोलीस,उप प्रादेशिक परिवहन विभागाने आठवडयातून एकदा विशेष मोहम आखून अनधिकृत वाळू वाहतूक करणारांवर कारवाई करावी. यवत व पाटस या क्षेत्रीय पोलीस विभागानेही सोलापूर-पुणे महामार्गावरुन होणा-या अनधिकृत वाळू वाहतूकीवर कारवाई करावी, अशाही सूचना यावेळी दिल्‍या.

यावेळी उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000