वावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे – पालकमंत्री आदिती तटकरे

437

गिरीश भोपी.रायगड,

करोनाशी संपूर्ण देश, राज्य, जिल्हा संघर्ष करीत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. वावळोली आश्रमशाळा येथील कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज तहसिलदार दिलीप रायन्नावार यांना सुधागड येथे दिल्या.
वावळोली आश्रमशाळा येथील 100 खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रांत अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार दिलीप रायन्नावार, अन्य तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सुधागड तालुक्याच्या संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला आणि तालुका प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी करोना विषाणूचा लढा देताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे सांगून नागरिकांनी करोना विषाणूबाबत काळजी करू नका तर काळजी घ्या, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायजरचा वापर, स्वच्छता या बाबीही कटाक्षाने पाळा,असे आवाहन केले.
यावेळी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी पालकमंत्री महोदयांना माहिती देताना सांगितले की, सुधागड तालुक्यात करोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पाली, (खाटांची संख्या-2), प्राथमिक आरोग्य केंद्र, जांभूळपाडा (खाटांची संख्या-2), लक्ष्मी चारीटेबल ट्रस्ट, पाली (खाटांची संख्या-20), तर कोविड केअर सेंटर, आश्रमशाळा, वावळोली (खाटांची संख्या-100) अशा पद्धतीने विलगीकरण कक्ष स्थापिक करण्यात आले आहेत. सुधागड तालुक्यात मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 227 असून या सर्व नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. तालुक्यात कामानिमित्त इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची संख्या 7 हजार 313 असून त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
श्री.रायन्नावार यांनी पुढे माहिती दिली की, स्क्रीनिंग केलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 665 आहे. आतापर्यंत तपासण्या झालेल्या व्यक्तींची संख्या पाच असून त्यापैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह असून एक अहवाल प्रलंबित आहे. दि. 1 मे 2020 पासून होमक्वॉरंटाईंन केलेल्या 196 व्यक्ती आहेत. परराज्यात जाणाऱ्या कामगारांची संख्या बिहार-164, ओडिसा-3, राजस्थान-14, झारखंड-26, मध्यप्रदेश-63, कर्नाटक-21, गुजरात- 2, केरळ-1, पंजाब-1, तामिळ-1, तेलंगणा-1, छत्तीसगड-7 असे एकूण 304 आहेत. महाराष्ट्रात परजिल्ह्यात जाणाऱ्या व्यक्तींची संख्या 336 आहे.
सुधागड तालुका तहसील कार्यालयात 24×7 करोना नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात शेल्टर होम साठी बल्लाळेश्वर भक्तनिवास क्रमांक एक व दोन (दोन हॉल), वसतिगृह (3 हॉल), आश्रम शाळा (2 हॉल) अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सुधागड तालुक्यात शिवभोजन केंद्राची संख्या 6 असून मंजूर शिवभोजन थाळींचा इष्टांक 475 आहे. तसेच तालुक्यात श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांच्यातर्फे गरजू लोकांकरिता अन्न वाटप चालू करण्यात आले असून 230 कामगारांची रात्रीच्या वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ताडगाव येथील 113 कामगारांची मंडळ अधिकारी यांनी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. परळी भागात 161 कामगारांची स्थानिक स्तरावर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर पाली येथे 375 कामगारांना शिवभोजन जेवणाची घरपोच व्यवस्था करण्यात आलेली आहे.
अन्नधान्य वाटपाबाबत श्री.रायन्नावार यांनी पालकमंत्री महोदयांना माहिती देताना सांगितले की, सुधागड तालुक्यासाठी 100 क्विंटल तांदूळ आणि 50 क्विंटल गहू मोफत धान्य वाटपासाठी प्राप्त झाले असून त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 500 व्यक्तींना प्रति व्यक्ती तीन किलो प्रमाणे 75 क्विंटल तांदूळ, प्रति व्यक्ती दोन किलो प्रमाणे 50 क्विंटल गहू मोफत वाटप करण्यात आला असून 25 क्विंटल तांदूळ वाटप करण्याचा शिल्लक आहे.
000000