पिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरेल-डॉ.अफरोज अहमद

877

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास व सहकारी मच्छिमार संस्थेच्या सहकार्याने सुरू झालेली पिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरून या भागातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आगामी काळात हा परिसर गेम फिशिंग आणि इको टुरिझमचा भाग होईल,असे प्रतिपादन नर्मदा सरोवर प्राधिकरणाचे महाराष्ट्र शासनाचे सल्लागार डॉ. अफरोज अहमद यांनी केले.
सरदार सरोवर प्रकल्पातर्गत पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा शुभारंभ खर्डी,ता. धडगाव येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते यावेळी पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील, मुख्य वनसंरक्षक अमित कळसकर,अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे,मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद नाईक, दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.विवेक वर्तक, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते.
डॉ.अहमद म्हणाले,नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना वरदान ठरला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला 70 किलोमीटर चे बॅक वॉटर आले आहे. या पाण्याचा पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मत्स्य संशोधन केंद्राचे सहकार्य घेण्यात आले नदीच्या पाण्यात मासे जीवंत राहणे म्हणजे पाणी शुद्ध असल्याचे निदर्शक आहे या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासी बांधवांना 4200 हेक्टर चे जंगल उपलब्ध करून दिले याशिवाय मूलभूत सोयी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आदिवासी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.त्यासाठी राज्य शासनाचे महसूल,मदत व पुनवर्सन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले,असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात हा मत्स्य व्यवसाय प्रकल्प देशाला मार्गदर्शक ठरेल त्यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल या भागांत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन आदिवासी बांधवानी करावे, असे आवाहन डॉ.अहमद यांनी केले नर्मदा नदीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून या भागात कृषी महोत्सवाप्रमाणेच मत्स्य महोत्सव आयोजित करावेत, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी बगाटे यांनी केले या भागाचा शाश्वत विकास आणि धूप थांबविण्यासाठी लोकसहभागातून उपक्रम हाती घेण्यात येतील असे मुख्य वनसरंक्षक कळसकर म्हणाले सहसचिव पाटील यांनी हा उपक्रम अनुकरणीय असून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल,असे सांगितले.मत्स्य शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.वर्तक यांनी सांगितले,कृषी विद्यापीठ व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा पहिलाच क्षेत्रीय प्रयोग यशस्वी झाला असून तो यापुढे ही शाश्वत पद्धतीने सुरू ठेवावा हा प्रयोग आव्हानात्मक होता मात्र,सांघिक कार्य केल्याने तो यशस्वी झाला त्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यात तीन हजार पिंजरे देण्यात आले असून आगामी काळात मत्स्य विक्री साठी स्कुटी देण्याचा विचार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
—-
महिला आयोगाच्या अध्यक्षा जिल्हा दौऱ्यावर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर 15 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 10 वाजता ‘प्रज्वला’ अंतर्गत महिला बचत गटाच्या कार्यक्रमास त्या उपस्थित रहातील.(स्थळ: शिवाजी नाट्य मंदिर नंदुरबार) दुपारी 2 वाजता त्या मिराप्रताप लॉन शहादा बायबास रोड शहादा येथे उपस्थित रहातील.
—-
बचत गटांच्या महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांचेकडून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बचत गटातील महिलांसाठी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 15 जून 2019 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर नंदुरबार येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण’ या विषयावर महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच महिला विषयक कायद्याची माहिती महिला विषयक शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिला बचत गटाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग,मुंबई यांचेकडून समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीमध्ये दिपाली मोकाशी,शलाका साळवी, मिनल मोहाडीकर,उषा वाजपेयी,स्मिता परचुरे व कपालिनी सिनकर या पदाधिकारी यांचा समावेश आहे. कार्यशाळेस लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.महिला बचत गटातील महिलांनी कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन गट विकास अधिकारी अशोक पटाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती दूरध्वनी क्रमांक 02564-222248 या क्रमांकावर संपर्क साधावा.
0 0 0 0 0 0 0 0

17 जून रोजी महिला लोकशाही दिन

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने शासन निर्णयानुसार महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे सोमवार 17 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील रंगावली सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्यांचे निरसन करण्यासाठी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी कळविले आहे.
महिला लोकशाही दिनात, तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे,न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत.अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रुम नं.226,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड, नंदुरबार यांच्या कार्यालयात (दुरध्वनी क्र.02564-210047) साधावा.
0 0 0 0 0 0 0 0 0

18 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने 18 जून 2019 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेस हॉल शनिमंदीर रोड नंदुरबार येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सुमारे 740 उमेदवारांची भरती होणार आहे. बेराजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी नवभारत फर्टीलायझर प्रा.लि.धुळे/ नंदुरबार,नव किसान बायो प्रा.लि हैद्राबाद(धुळे/जळगाव), जी फोर एस सिक्युरीटी अहमदाबाद/सुरत(गुजरात), प्रोसॉफट प्लेसमेंन्ट धुळे, बि.आर.फॉशन गारमेंन्ट कंपनी देवभाणे धुळे,कोजर्न्ट ई-सर्व्हिसेस प्रा.लि.गुजरात, यशस्वी ॲकडमी फॅर स्किल पुणे,वेस्टर्न रिफ्रिगिशन इंडीया प्रा.लि.वापी गुजरात,एसिएन्ट पेंन्ट सुरत-गुजरात,स्टार मॅनपावर ॲन्ड होस्पिटीलीटी सर्व्हिसेस गुजरात हे उद्योजक/नियोक्ते उपस्थित राहणार आहेत बरोजगार मेळाव्यात सातवी,
दहावी,बारावी, पदवीधर,
डिप्लोमा,आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे उपरोक्त शैक्षणिक पात्रता व अटीत बसणाऱ्या व इच्छूक असलेल्या जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवरांनी रोजगार मेळाव्यास स्वखर्चाने आपल्या सर्व शैक्षणिक पात्रता तसेच सर्व कागदपत्रे तसचे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार यांचेकडील स्वत:चे ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक संचालक रा.म.कोल्हे यांनी केले आहे.