भारतीय उद्योजकांनी अफगाणिस्तानात उद्योग उभारावेत ;नदीम शरीफी यांचे आवाहन

655

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे पश्चिम विभागीय पुरस्कारांचे वितरण

मल्हार न्यूज(ऑनलाईन)

पुणे : “अफगाणिस्तानात पेट्रोलियम, मेडिसिन यासह फळे आणि सुकामेवाचा उत्पादनाच्या निर्यातीत मोठ्या संधी आहेत. कार्पेट, मार्बल्स, सिल्क, सफ्रॉन या गोष्टीं अफगाणिस्तानात प्रसिद्ध असून, त्यात व्यवसाय उभारण्यासाठी भारतीयांना संधी आहेत. आमच्या देशात उद्योग सुरु करण्याची प्रक्रिया आणि करप्रणाली अतिशय सोपी आहे. त्याचा परवानाही केवळ तीन दिवसात मिळतो. भारतीयांकडे ज्ञान आणि व्यावसायिक तंत्र मोठ्या पप्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकांचे अफगाणिस्तानात स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय उद्योजकानी अफगाणिस्तानात येऊन उद्योग उभारावेत,” असे आवाहन अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नदीम शरफी यांनी केले.

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) आयोजित पश्चिम विभागीय पुरस्कार सोहळ्यावेळी नदीम शरीफी बोलत होते. प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल अब्दुल नफी सरवारी, इथिओपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, ‘जीआयबीएफ’चे ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी, कोऑर्डिनेटर दीपाली गडकरी, अभिषेक जोशी आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या २५ उद्योजकांना ‘जीआयबीएफ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याआधी ‘पश्चिमेपलिकडील व्यापार आणि अफगाणिस्तान, इथियोपिया व इंडोनेशिया येथे व्यापाराच्या संधी’ या विषयावर चर्चासत्र झाले. अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल नदीम शरिफी, इथियोपियाचे कॉन्सुल जनरल तेस्फामरियम मेस्केल, अनंत सरदेशमुख, हरि श्रीवास्तव, सागर आरमोटे, निखिल ओसवाल यांनी सहभाग घेतला. यावेळी भारतातील व्यावसायिक बाहेरच्या देशात जाऊन उद्योग किंवा त्या देशातल्या व्यक्तीसोबत व्यवसायात भागीदारी कशाप्रकारे करू शकतात, यावरही चर्चा झाली. इथियोपियाच्या कॉन्सुल जनरल मेस्केल यांनी तेथील नियम, अटी, कायदा, प्रसिद्ध वस्तू, प्रचलित व्यवसाय, भारतीयांसाठीच्या संधी अशा गोष्टींवर मार्गदर्शन केले. कॉफीच्या क्षेत्रात उद्योग करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी उपलब्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “जगभरातील व्यापाराच्या संधींचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या पाच वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. अनेकदा अमेरिकेसह इतर देशांमध्ये जाणे झाले. सगळे जग भारताकडे व्यापारी संधींचे दालन म्हणून पाहत आहे. विविध देशातील उद्योजक भारतात येत आहेत, तर भारतीयांनाही परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निमंत्रित केले जात आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने विविध देशांत व्यापारासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा भारतीय उद्योजकांनी फायदा उठवावा. सर्व प्रकारच्या उद्योगांना जागतिक व्यासपीठ देण्यासाठी डॉ. जितेंद्र जोशी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.”

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “कोणत्याही देशाच्या प्रगतीत तेथील औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा असतो. लघु व मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तारासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम काम करत आहे. या फोरममध्ये अनेक देशांचे कॉन्सुलेट, मंत्री सहभागी होत असून, उद्योग देवाणघेवाण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.” मुग्धाला करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.