वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा; सहा.पो.निरी अश्विनी पाटील

614

पुणे प्रतिनिधी,
सायबर गुन्हे व महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न
पुणे: अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु नये, असे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड, पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, प्रा.डॉ. संजय तांबट, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
श्रीमती पाटील म्हणाल्या, महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन दक्ष असून संकटसमयी महिलांनी न घाबरता पोलीस प्रशासनाशी वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत तात्काळ मदत पोहचू शकते. आपणा सर्वांची फसवणूक मॅट्रीमोनिअल साइट, फेसबुक, व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम माध्यमातून होते. यामध्ये शाळकरी मुलींपासून ते प्रौढ महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी महिलांनी दक्ष राहण्याबरोबरच मनाने खंबीर राहणे गरजेचे आहे. आपल्या हातून काही गंभीर चूक घडली आहे असे वाटून आपल्याकडून ती लपविली जाते. त्यातून अनेक चुका आपण करत जातो. त्यामुळे वेळीच आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन याची माहिती दिल्यास तसेच पोलिसांशी संपर्क साधल्यास या गोष्टींना वेळीच चाप बसविणे शक्य होते.
श्रीमती पवार यांनी समाजमाध्यमांचा वापर करत असताना त्यामध्ये अनेक सुरक्षाविषयक पर्याय असतात, त्या पर्यायांचा वापर न केल्याने अनेकांना चुकीच्या गोष्टींना बळी पडावे लागते, हे उदाहरणासह स्पष्ट केले. अकाउंटची सत्यता तपासणे, टू स्टेप ऑथेंटिकेशन करुन घेणे, आपली फेसबुक व अन्य अकाउंटची माहिती आपल्या मित्रांपर्यंतच मर्यादित ठेवणे आदी गोष्टींबाबतही त्यांनी माहिती दिली.
श्रीमती टिळेकर यांनी महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्याबाबतच्या विविध युक्ती सांगितल्या. त्या म्हणाल्या, महिलांच्या मदतीला पोलीस यंत्रणा तर आहेच, परंतु पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत समोरच्या व्यक्तीपासून बचाव करण्यासाठी युट्युबवर अनेक युक्त्या सुचविल्या आहेत. तसेच सेफ्टी पीन ॲप, रक्षा ॲप, विथ यु सारखे महिला संरक्षणासाठीचे ॲप आहेत. त्याचबरोबर 1091 क्रमांकावर फोन केल्यास दामिनी पथक तसेच 100 क्रमांकाची हेल्पलाईन आहे. संकटकाळात महिलांनी याचा फायदा घ्यायला हवा, जेणेकरुन तात्काळ मदत मिळू शकेल.
डॉ. तांबट म्हणाले, बदलत्या काळानुसार महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे स्वरुपही बदलत आहे. यासाठी महिलांनी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करुन समाजात आत्मविश्वासाने वावरायला हवे.

माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कार्य विषद केले. नोकरीचे बदलते स्वरुप लक्षात घेता महिलांनी समाजात वावरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाकडून कोणकोणत्या स्वरुपात मदत पोहचविली जाऊ शकते याची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी महासंचालनालयाच्या वतीने राज्यभर याविषयीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मोहन राठोड यांनी तर वृषाली पाटील यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला पत्रकार, पत्रकारिता, परकिय भाषा विभाग व अन्य विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.
————————