रोहयो अंतर्गत सार्वजनिक उपयोगाची कामे सुरू करावीत -जयकुमार रावल

1188

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक उपयोगाची कामे सुरू करावीत आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील दुष्काळी भागाच्या पाहणी प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी.मोरे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील आदी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की रोहयो अंतर्गत आलेल्या सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना तात्काळ मंजूरी देण्यात यावी त्याचबरोबर आवश्यकतेनुसार रस्ते, गाळ काढणे आणि वृक्ष लागवडीची कामे घेण्यात यावी.ग्रामस्थांना केलेल्या कामांची मजूरी सात दिवसाच्या आत देण्यात यावी.नागरिकांना गावातच काम मिळून कोणाचेही स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी सांगितले.तापी-बुराई योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जुलै महिन्यात पूर्ण होऊन नागरिकांना सप्टेंबरपर्यंत याचा लाभ मिळू शकेल. पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून हाटमोहिदा येथे पंप बसविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.हाटमोहिदा-निंबेल,निंबेल-आसाणे आणि आसाणे- शनिमांडळ पाईपलाईनचे कामदेखील वेगाने पुर्ण करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील भागाला पाणी उपलब्ध करून देता येईल मालपूर प्रकल्पात यामुळे पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे परिसरातील गावांना त्याचा लाभ मिळू शकेल.खोक्राळे,वैदाणे,खर्दे खुर्द,सैताणे,बलवंड, रजाळे,ढंढाणे या भागात सातत्याने पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची तीव्रता वारंवार जाणवते. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी कायमची सुविधा करण्यावर भर देण्यात येत असून त्यादृष्टीने ग्रामस्थांनी योग्य प्रस्ताव दिल्यास त्यास मंजूरी देण्यात येईल. खोकराळेसाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळविण्यासाठी न्याहली ग्रामस्थांशी संवाद साधण्यात येईल.वैंदाणे येथे विंधनविहीरीच्या कामास मंजूरी देण्यात येईल.तसेच या गावाच्या चारा प्रश्नाविषयी प्रशासनाला आवश्यक सुचना करण्यात येतील, असेही श्री.रावल म्हणाले.ज्या गावात तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण होण्यास उशिर होणार असेल त्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हाटमोहिदा येथे तापी-बुराई प्रकल्पाची पाहणी केली.पहिल्या टप्प्याचे काम लवकर पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तेथील ग्रामस्थांशीदेखील त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
———-

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

नंदुरबार सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, नंदुरबार तसेच धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य मार्केट यार्ड येथे 61 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे,जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे,जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखडे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भावी जिवनासाठी शुभेच्छा दिल्या. नवदाम्पत्यामध्ये जिल्हा तसेच राज्याबाहेरील वधू-वरांचादेखील समावेश होता.
—–
नागरिकांना दिलासा देण्यासाठी संवेदनशिलतेने कामे करा

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या समस्या तात्काळ दूर कराव्यात आणि अधिकाऱ्यांनी संवेदनशिलतेने कामे करावीत असे प्रतिपादन राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे आदी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विंधन विहिरी आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्यास टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. येत्या काळात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे पर्यायी नियोजन तयार ठेवावे.
तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या गावपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन टंचाईचा आढावा घ्यावा रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत बैठकीद्वारे नागरिकांना माहिती देण्यात यावी. सामाजिक वनीकरण व वनविभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम रोहयो अंतर्गत घ्यावे. तसेच दुष्काळ स्थितीत शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीदेखील देण्यात यावी शहरातील स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात यावे. जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढवावा व आवश्यक त्या ठिकाणी तलावातील गाळ काढण्याची कामे वेगाने करण्यात यावीत. वनविभागाने वनक्षेत्रात असणाऱ्या तलावातील गाळ काढण्यासाठी मंजूरी द्यावी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुष्काळी अनुदानाबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात यावे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी,धान्य,चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन तयार ठेवावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्यात 12 तात्पुरत्या पाणी योजनांचे काम पुर्ण झाले आहे 23 विंधनविहिरींचे काम पुर्ण झाले असून 61 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे 4 विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे धडगाव तालुक्यात एका टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.