दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या चित्रपटाचा ‘टकाटक’ ट्रेलर प्रदर्शित…

1191

अनिल चौधरी, पुणे                             

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाचीच चर्चा रंगू लागली आहे.

‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ असे एका पेक्षा एक करमणूकप्रधान चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी काही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे. समाजातील एखादा विषय गंमतीशीर शैलीत प्रेक्षकांसमोर मांडत त्यांना तो सहजपणे पटवून देण्याचा हातखंडा असणाऱ्या मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’मध्ये नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

‘टकाटक’चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कामेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १०० टक्के शुद्ध विनोदांना प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पाइंट आहे. सेक्स कामेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकंच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटात देण्यात आला आहे.

ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही या चित्रपटात अनुभवायला मिळेल. प्रथमेशनं आजवरच्या आपल्या कारकिर्दीत आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत.

दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी निर्माते अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. प्रेमकथेचा गाभा लाभलेल्या ‘टकाटक’साठी जय अत्रे यांनी गीतलेखन केलं आहे. या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार वरुण लिखते यांनी समधूर आणि सहजपणे ओठांवर रुळतील अशा चाली लावून संगीत दिलं आहे. गायक आनंद शिंदे आणि श्रुती राणे यांनी या सिनेमातील गीतं गायली आहेत. हजरथ शेख (वली) यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. मुंबई, ठाणे, भोर तसेच गोवा या ठिकाणच्या विविध लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट २८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.