“आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान” – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

599

पुणे प्रतिनिधी,

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान केंद्रांची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे, जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच खबरदारी घेतली असून सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित आहेत. कोणत्याही मतदान केंद्रात पाण्याची गळती नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला. जी मतदान केंद्र पहिल्या आणि दुस-या मजल्यावर होती, ती तळमजल्यावर आणण्यात आली असून त्याबाबतची माहिती वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. जी मतदान केंद्रे पहिल्या अथवा दुस-या मजल्यावर आहेत, तिथे लिफ्टची सोय उपलब्ध आहे. दिव्यांग मतदार, वयोवृध्द मतदार यांच्याबाबत किमान आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. काही मतदान केंद्राच्या परिसरात पावसामुळे थोडा चिखल झाला आहे, तिथे बारीक मुरुम टाकून तो परिसर चिखलमुक्त करण्याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी दिली. सोमवार, दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी “आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान” अशा काव्यात्मक भाषेत मतदान करण्याचे आवाहन करुन पुणे जिल्हृयातील मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.