पुणेकरांच्यावतीने विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा  ‘विश्वशांतीरत्न पुरस्कारा’ ने होणार सन्मान ३० मे रोजी सीओईपी येथे होणार नागरी सत्कार समारंभ

138

पुणे,

विश्वशांती व विश्वकल्याणाच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था आणि समस्त पुणेकरांच्या वतीने नागरी सत्कार करून ‘विश्वशांतीरत्न पुरस्कारा’ ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचा हा सत्कार ३० मे २०२४ रोजी संध्याकाळी ४.४५ वा. शिवाजी नगर येथील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या प्रेक्षागृहात करण्यात येणार आहे. अशी माहिती जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ व युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रामचे माजी संचालक, ग्रीन टेर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ ए. माशेलकर असतील. तसेच जगप्रसिध्द संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे असतील.
त्याच प्रमाणे डॉ. भूषण पटवर्धन, खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील आणि सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील बिरूड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकाराने व माजी आमदार उल्हासदादा पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आचार्य रतनलाल सोनग्रा आणि हभप बापूसाहेब मोरे यांच्या सहयोगाने सदरील सत्कार समारंभ संपन्न होईल.
तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान, युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाची संकल्पना व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहोचविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख व विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यूके आणि यूएसचा दौरा केला होता. या दौर्‍या दरम्यान अमेरिकेतील, उटाह राज्यातील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बीवाययूचे अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतुक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले.
तसेच, अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्रा.डॉ. कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प घेतला.
लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये आयोजित ‘मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती’ यावरील गोलमेज परिषदेत सहभाग घेऊन त्यांनी सांगितले की,शिक्षण पद्धतीत वैश्विक मूल्याधिष्टीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यातूनच विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेले नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा. विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेले कार्य अत्यंत उत्तुंग आहे. त्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताबरोबरच पुण्याची मान उंचावली आहे. त्या निमित्तानेच सर्व पुणेकर आणि शहरातील विविध सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पात्रे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

जनसंपर्क अधिकारी