पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापकडून प्रितम म्हात्रे यांचे नाव निश्चित

1022

गिरीश भोपी, पनवेल

विधानसभा निवडणुकीसाठी पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापकडून विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

        २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीतील प्रशांत ठाकूर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळाराम पाटील कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापकडून कोणता उमेदवार असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी, काही महिन्यांपासून पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील आणि पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. परंतु काशिनाथ पाटील यांनी ही निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे प्रितम म्हात्रे यांचे नाव निश्चित करण्यावर एकमत झाले असल्याची चर्चा आहे.
        माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी त्यांचे व्यावसायिक संबंध अत्यंत चागले आहेत. त्यामुळे जे.एम. म्हात्रे आपल्या मुलाला प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात उभे करणार नाहीत, अशीही चर्चा होती. परंतु माजी आमदार विवेक पाटील यांच्या आग्रहाखातर जे. एम. म्हात्रे राजी झाले असून शेकपने प्रितम म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास लवकरच म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केली जाईल. परंतु दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या झाल्यास प्रितम म्हात्रे यांच्या नावाची कदाचित अधिकृत घोषणा केली जाणार नाही, परंतु शेकापच्या विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमातून त्यांच्या उमेदवारीची तयारी केली जाईल.