“कॉलेज डायरी” चित्रपटाचे संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा संपन्न

994

अनिल चौधरी, पुणे 

भावेश काशियानी फिल्म्स प्रस्तुत व आयड्रिम्झ फिल्मक्राफ्टच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला “कॉलेज डायरी” हया मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. बॉलीवुडचे सुप्रसिद्ध  पार्श्वगायक बेन्नी दयाल यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात हया सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी निर्माते भावेश काशियानी, दिग्दर्शक अनिकेत जगन्नाथ घाडगे, गायक व संगीतकार निरंजन पेडगावकर, रेवा यांच्यासहित अनेक मान्यवर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार, म्युझिक टीम व प्रॉडक्शन टीम उपस्थित होती.  “कॉलेज डायरी” हा भारतातील पहिला चित्रपट असेल ज्यात मराठी, हिन्दी, संस्कृत, तमिळ व इंग्लिश हया पाच विविध भाषेतील गाणी आहेत. मराठीत सिनेमात प्रथमच एकाच चित्रपटात विविध भाषेतील गाणी दाखवण्याचा जागतिक विक्रम हया चित्रपटाने केला आहे. यातील गाणी गायक शान, पियुष मिश्रा,बेन्नी दयाल, निरंजन पेडगावकर, शाल्मली खोलगडे,आनंदी जोशी हया दिग्गजांनी गायिली असून निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. निर्माते भावेश भवन काशियानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अनिकेत जगन्नाथ घाडगे हया तरुण दिग्दर्शकाने अनेक जागतिक चित्रपटांचा अभ्यास करून हया चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कॉलेज डायरी म्हणजे कॉलेज मधील मजा, मस्ती, घट्ट मैत्री, मैत्री मधली भांडणं, किस्से हे सर्व हया चित्रपटात दाखविण्यात आले आहेच, पण त्याबरोबरच खरी आणि कडवी बाजू हया चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हया चित्रपटाची कथा एका कॉलेज कॅम्पस मध्ये घडते. या कॅम्पस वर आधीपासून तिथल्या राजकारणी माणसाचा वरदहस्त आहे,त्यामुळे अवैध प्रकार तिथे चालू आहेत. हया अश्या वातावरणात काही मुलांवर अन्याय केला जातो. एका क्षणानंतर झालेल्या या अन्यायाला ती मुले कशी उत्तर देतात व ते करत असताना त्या मुलांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडतात ते या सिनेमात पाहायला मिळेल. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड,समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतिक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतिक गंधे, हेमलता रघु, जनार्दन कदम हे प्रमुख कलाकार आहेत. हे सर्व कलाकार नावाने नवीन असले तरी रंगभूमीवर घडलेले अष्टपैलू कलाकार आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन ढोबळेपाटील असून प्रसिद्धी आणि मार्केटींगची जबाबदारी श्रिनीवास कुलकर्णी आणि राजू अनासपुरे सांभाळीत आहेत. लवकरच हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमाग्रहात  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.