पोलीस ठाण्यातच लाच घेणाऱ्या सहा.फौजदारास अटक

1257

अनिल चौधरी, पुणे

मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील सहा.फौजदार अंकुश दत्तू बोराटे, नेमणूक मालेगाव तालुका पोलीस ठाणे , नाशिक ग्रामीण यांना १०,०००/- रुपये लाच स्वीकारताना पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,नाशिक विभागाने केली आहे. पोलिसास पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना अटक झाल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्काच्या चर्चा सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक  विभागचे उपाधिक्षक विश्वजित जाधव म्हणाले कि, यातील तक्रारदार महिला यांच्या मुलाविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्यास मालेगाव न्यायालयाने जामीन मंजूर करून पोलीस ठाण्यात हजेरी लावावयास सांगितले होते. सदर बलात्कार प्रकरणात मा.मालेगाव न्यायालयाने पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या प्रकरणात सूट मिळावी म्हणून व आरोपीच्या नावावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांच्या तपासी कामात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दत्तू बोराटे यांनी तक्रारदाराकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.  यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, नाशिक कार्यालयात तक्रार दाखल दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता ती खरी असल्याचे आढळले. त्याप्रमाणे एसीबी नाशिक पथकाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सापळा लावला. तक्रारदाराकडून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील दुय्यम अधिकारी कक्षात 10,000 /- रुपये लाच स्वीकारताना सहा.पोलीस निरीक्षक अंकुश दत्तू बोराटे यांना रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) चे पोलीस उपअधिक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत त्यांनी अँटी करप्शन ब्युरो टोल फ्री. क्रमांक १०६४ संपर्क करावा , असे आवाहन केले आहे.