अनिल चौधरी, पुणे
बी लाइव्ह प्रस्तूत लकी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.
ट्रेलर लाँच सोहळ्याला लकी सिनेमाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच सिनेमाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणे ही दाखवण्यात आले. हे गाणे अभिनेते जीतेंद्र कपूर ह्यांना एवढे आवडले की, त्यांनी लकी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय महाजनसोबत ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’ डान्सही केला. अभिनेते जीतेंद्र कपूर ह्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हा ट्रेलर पाहून सिनेमाला नक्कीच बंपर ओपनिंग मिळेल, ह्यात मला काही शंका नाही. सिनेमातले गाणेच नाही, तर कलाकारही खूप छान आहेत. सिनेमाच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘तुफान’ कलाकारांची ही फिल्म आहे. ह्या सिनेमाला माझ्या शुभेच्छा.”डिस्को किंग बप्पी लाहिरींना सिनेसृष्टीत यंदा 50 वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून लकी सिनेमाच्या कोपचा गाण्याव्दारे डेब्यू झाला आहे. त्यानिमीत्ताने केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. बप्पी लाहिरी ह्यावेळी म्हणाले, “ज्या मराठी मातीने मला हे यश मिळवून दिले, त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा 50 वर्षांनंतर पार्श्वगायनात डेब्यू होतोय. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे गाणे माझ्या स्टाइलचे गाणे असल्याने मला विशेष आनंद होतो आहे.”
ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरही उपस्थित होता. तुषार म्हणाला, “माझ्या वडिलांच्या हिम्मतवाला सिनेमाला ‘कोपचा’व्दारे दिलेला ट्रिब्यूट मला खूप आवडला. गोलमाल सीरिजच्या सर्व सिनेमांमध्ये माझे नाव लकी असल्याकारणाने लकी सिनेमाशीही आता एक खास नाते निर्माण झाले आहे. सिनेमाचे निर्माते सूरज सिंग ह्यांच्याशी माझा 16 वर्षांचा ऋणानुबंध आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव ह्यांच्यासोबत मी ‘सी कंपनी’ सिनेमामध्ये काम केले होते. त्यामूळे ही माझी होम प्रॉडक्शन फिल्म असल्यासारखे मला वाटते आहे.”निर्माते सूरज सिंग म्हणाले, “हा ट्रेलर लाँच सोहळा म्हणजे दुग्धशर्करा योग होता. बप्पीदा आणि जीतूसर ह्या दोन लीविंग लिजेंड्सना एकत्र पाहण्याचा योग त्यानिमीत्ताने मिळाला. ह्या दोघांच्या सिनेमांवर आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. त्यांची कौतूकाची थाप मिळणं ही माझ्यासाठी खूप ‘लकी’ गोष्ट आहे.” बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.