गिरीश भोपी ,पनवेल :-
पनवेल येथील एसटी स्टँड परिसरात अवैध कार मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्यामुळे येथे एसटी चालकांना बसेस वळविण्यासाठी तसेच बसेस उभ्या करण्यासाठी जागा मिळत नाही . तसेच या खाजगी चारचाकी गाड्या उड्डाणपुलाखाली पार्क केल्या असल्यामुळे वाहतूक कोंडी हि नित्याचीच झाली आहे. या पार्क केलेल्या गाड्या मागे घेत असताना अनेकवेळा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. अशा खाजगी गाड्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा केली आहे. परंतु प्रशासनाला जाग येत नाही , येथे एखादा मोठा अपघात झाल्यावरच पोलीसांना जाग येणार आहे का असा उद्दिग्न सवाल येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
पनवेल मध्ये खाजगी कार अवैध रीतीने भाड्याने मिळण्याचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक विभाग त्याकडे डोळे झाक करत असून महत्वाच्या ठिकाणी हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. त्या. हे ठिकाण पनवेल एसटी स्टँड समोर असून त्या ठिकाणी वाहतूक विभागाची माणसं कार्यरत असतात पण या प्रकरणात ते लक्ष घालत नाहीत. त्यांच्याकडे विचारणी केली असता ती जबाबदारी RTO विभागाची सांगून आपले आंग काढून घेतात. आता सत्य काय याचा प्रश्न पनवेलवासीयांना पडत आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे , परंतु वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी गांधारीच्या भूमिकेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच एसटी चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत आम्ही नवी मुंबई पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. तसेच एसटीच्या वाहतूक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क केला असता तो झाला नाही.