अनिल चौधरी,
पुणे :- कुटुंबात कोणतेही मंगल कार्य असल्यास आपण पहिल्यांदा जुळवाजुळव करतो, ती सर्व सुविधांनी युक्त अशा मंगलकार्यालयाचा शोध घेतो. बऱ्याचदा ही कार्यालये अनेकांच्या आर्थिक आवाक्याबाहेरील असतात. त्यांचे भाडेही लाखोंच्या घरात असते. पण, या महागाईच्या काळातही पुणे शहरालगतच असलेल्या मांगडेवाडी येथे सर्व सुविधांनी युक्त आणि अत्यंत माफक दरांत सर्व साहित्यांसह मंगल कार्यालय सेवा पुरविली जात आहे. यात लॉन्स आणि लागणारे इतर साहित्यदेखील पुरविले जात आहे. ही सर्व सुविधा ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर बांधकाम उद्योजक तथा शेअर मार्केट सल्लागार असलेले पंकज अनंतराय देसाई हे पुरवित असून त्यांच्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीनुसार, सामाजिक दायित्व म्हणून ही सुविधा ते देत आहेत. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सौ. किर्तिदा पंकज देसाई, व गुपेशभाई मोहता उपस्थित होते.
पंकज देसाई यांचे मांगडेवाडीतील सर्व्हे नं. २२/२/१ येथे ‘यश मंगल कार्यालय’ आहे. पंकज यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात समाजसेवा केली. त्यात त्यांनी गोर-गरिबांचे प्रश्न सोडविणे, आर्थिक मदत करणे, वेळप्रसंगी धावून जाणे अशी अनेक कामे केली. तोच वारसा पंकज आणि त्यांच्या भावंडांनी सुरू ठेवला आहे. पंकज हे गेल्या ३५ वर्षांपासून मुंबई आणि पुणे येथे वास्तव्यास असून गरिबांना हक्काचे घर मिळावे, या उदात्त हेतूने विरार येथे त्यांनी के. पी. डेव्हलपर्सच्या माध्यमातून अत्यल्प दरांत घर उपलब्ध करून दिली आहेत.
पंकज आपल्या वडिलांबद्दल म्हणाले. ‘माझे वडील नेहमी समाजाचा विचार करत असत. आम्ही भावंडांनी गोरगरिबांची सेवा करून त्यांना स्वस्त दरांत घरे उपलब्ध करून द्यावीत, ही त्यांची अंतिम इच्छा होती. शिवाय गरिबांना आर्थिक मदत करावी, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आर्थिक मदत ही काही काळापुरती असते, ही बाब लक्षात घेऊन पैशांअभावी मोठे मंगल कार्यालय न परवडणाऱ्या नागरिकांसाठी केवळ १० हजार रुपयांमध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले मंगल कार्यालय देत आहोत.’पंकज यांनी सांगितले, ‘या मंगल कार्यालयात एकाच वेळी ४०० ते ५०० लोकांची बैठक व्यवस्था उपलब्ध आहे. सोबतच खुर्ची, डेकोरेशन, वीजपुरवठा, म्युझिक सिस्टीम, जेवणासाठी लागणारे प्लेट्स, वाट्या, ग्लास इ. साहित्य याच १० हजार रुपयांत उपलब्ध करून दिले जाते. निमंत्रितांसाठी विरंगुळा म्हणून वाचनालय, प्रार्थनेसाठी मंदिरदेखील आहे. या मंगल कार्यालयात लग्न, वाढदिवस कार्यक्रम, लग्नाचा वाढदिवस, सामुहिक प्रार्थना यांसह सर्व कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात,’ असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना फक्त ३ हजार रुपयांत सेवा
ज्येष्ठ नागरिकांना या मंगल कार्यालयात कार्यक्रम साजरा करावयाचा असल्यास त्यांच्यासाठी फक्त ३ हजार रुपये इतके सवलतीचे भाडे असल्याचे पंकज देसाई यांनी सांगितले
संस्था, संघटनांना आवाहन
आज ज्यांच्याकडे मोठी संपत्ती आहे, ते लग्नात पैशांची उधळपट्टी करतात. मात्र ज्यावेळेस गरिबांना मदत करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांचा हात मात्र आखडता होतो. गरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. तसेच जर एखाद्या संस्था, संघटनेला सामुहिक मेळावा घ्यायचा असल्यास त्यांनी आमच्या मंगल कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांना अत्यल्प दरांत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे पंकज देसाई पत्रकार परिषदेत म्हणाले.