मी पण सचिन – रंजक स्वप्नाचा प्रवास

915

योगेश बारसकर, पुणे :-                                              छोट्या गावातील क्रिकेटवेड्या सचिनचा आपल्या गावापासून ते लॉर्डसच्या मैदानापर्यंतचा प्रवास हा मी पण सचिन या चित्रपटामध्ये रंजकपणे दाखवण्यात आला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याने पहिल्यांदाच ग्रामीण तरुणाची केलेली भूमिका लक्षवेधी ठरते. दिग्दर्शक श्रेयस जाधव याने पहिल्याच प्रयत्नात आपली छाप पाडली आहे.
भोर या गावातील इतर मुलांप्रमाणेच सचिनला क्रिकेट चे वेड आहे. परंतु गल्ली क्रिकेट आणि आपल्या गावामध्ये पन्नास-शंभर रुपयांसाठी पैंजा लावून क्रिकेट खेळण्याच्या पलीकडे त्याचा प्रवास जात नाही. त्याचे स्वप्न मात्र मोठे आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डस येथे आपण एकदा तरी खेळावे हे त्याचे स्वप्न. आणि त्याचा आयडॉल आहे अर्थातच सचिन तेंडुलकर. सचिन प्रमाणे आपणही लॉर्ड्स मैदान गाजवावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिन ने केलेली धडपड, त्याच्या स्वप्नांमध्ये आलेले अडथळे, त्याबरोबर येणाऱ्या व्यक्तिरेखा गावाचे गावपण दिग्दर्शकाने अतिशय चांगल्या पद्धतीने साकारलेआहे. महत्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी अविनाश नारकर, सुहिता थत्ते, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे, कल्याणी मुळे अशा कसलेल्या कलाकारांची केलेली निवड चित्रपटामध्ये जिवंतपणा आणते. यामध्ये सर्वात लक्ष वेधून घेते ती अभिजीत खांडकेकर याने साकारलेली राजा देशमुख ही भूमिका. व्यक्तिरेखेचे अनेक पदर अभिजीत ने आपल्या सहज अभिनयातून अतिशय सुंदर पणे उलगडले आहेत. गाडीची काच फोडल्यानंतर सचिनच्या अंगावर धावून जाणारा राजा देशमुख, लंडन ला जाण्याचे तिकीट आपल्यालाच मिळायला हवे यासाठी कुटील कारस्थान करणारा खलनायक अभिजीत ने अतिशय दमदार पद्धतीने साकारला आहे. कलाकारांनी आपल्या भूमिका समजून केल्या असल्या तरी पटकथेच्या बाबतीमध्ये उणिवा जाणवतात मध्यंतरापूर्वी सचिनला असलेली क्रिकेटची गोडी काही दृश्यांमधून चांगल्याप्रकारे दाखवण्यात आली आहे. परंतु गावामध्ये झालेली पूर्ण मॅच दाखविण्यामध्ये दिग्दर्शकांनी खूप वेळ घेतल्यामुळे चित्रपट बराच संथ होतो. चित्रपट पाहताना अनेकदा लगान मधील काही दृष्यांची तर मध्यंतरानंतर दंगल मधील काही दृश्यांची आठवण होते. आपला चित्रपट पाहताना इतर चित्रपटाची आठवण होऊ नये यासाठी दिग्दर्शक प्रयत्न करताना दिसतात. परंतु येथे मात्र दिग्दर्शकावर या दोन्ही चित्रपटांचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे पटकथेवर अधिक काम करण्याची गरज होती. काही उणिवा असल्या तरी एका सरळ साध्या स्वप्नांची रंजक कथा अनुभवण्यासाठी मी पण सचिन हा चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहायला हवा.