मोमिनपुरातील बेस्ट बेकरीच्या आगीत एकाचा मृत्यू

1356
भूषण गरूड पुणे,
मोमिनपुरा येथील बेस्ट नावाच्या बेकरीच्या स्टोरेज रूममध्ये आग लागल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या बेकरीच्या पाठीमागील पोटमाळ्यावर टेलरिंगचे काम करणारे दोन कामगार धुरामध्ये गुदमरले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन काही वेळातच आग विझविली. मात्र, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. विनोदकुमार सरोज (वय ३०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, महंमद अश्पाक लाडला (वय २१) हा जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनुपरा चांदतारा चौकात बेस्ट नावाची बेकरी आहे. या बेकरीची इमारत तीन मजली आहे. तळजमल्यावर बेकरी असून समोरून विक्रीचे काउंटर आहे; तर पाठीमागे खाद्य पदार्थांचे स्टोरेज आहे. पहिल्या मजला हा पोटमाळ्यासारखा असून त्या ठिकाणी टेलरिंग व कुशनचा व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी जाण्यासाठी स्टोरेज रुमपासून जिना आहे. या स्टोरेजमध्ये सायंकाळी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर येत होता. दूर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते. आगीमुळे टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या कामागारांना जिन्याने खाली येता येत नव्हते. त्यामुळे धूर आतमध्ये येऊ नये, म्हणून दोघे जण स्वत:च्या बचावासाठी स्वच्छतागृहात जाऊन बसले. त्यांनी पाठीने दार दाबून धरलेले होते. नागरिकांना या आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलास दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. पोटमाळ्यावर जाऊन अंधारात कामगारांचा शोध घेतला. त्या वेळी स्वच्छतागृहात धुरामुळे गुदमरून अत्यवस्थ अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले आहे. विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, सहायक अग्निशमन अधिकारी दत्तात्रेय नागलकर, तांडेल किसन गोगावले, चालक अतुल मोहिते, जवान संजय जाधव, स्वप्नील टुले, प्रदीप पवार, शैलेश गोरे यासह २५ ते ३० जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
मोठा अनर्थ टळला :-
आग लागलेली इमारत तळमजल्यासह तीन मजली आहे. तिसऱ्या मजल्यावर क्लास चालविले जातात. तर, दुसऱ्या मजल्यावर टेलरिंगचा व्यवसाय सुरू आहे. आग लागली त्या वेळी तिसऱ्या मजल्यावर क्लास सुरू होते. त्या ठिकाणी काही विद्यार्थी होते. आग लागल्यानंतर क्लास सोडून देण्यात आला. या ठिकाणी जाण्यास वेगळा जिना आल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही न झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
पत्र्या मारुती चौकात पुन्हा आग :-
नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील चहाच्या दुकानातील सिलिंडरने बुधवारी दुपारी आचानक पेट घेतला. अग्निशामन दलाच्या जवानांनी वेळीच ही आग आटोक्यात आणल्याने पुढील दुर्घटना टळली. काही आठवड्यांपूर्वी याच ठिकाणी दुकानांमध्ये आग लागली होती.