अवघ्या ४ तासात ‘ते’ हरवलेले दागिने मिळाले परत

821

अनिल चौधरी, पुणे :-

कल्याण येथून पुण्यामध्ये लग्नासाठी आलेल्या जोडप्याचे दोन लाख रुपये किंमतीचे हरवलेले सोन्याचे दागिने खडक पोलिसांनी चार तासात शोधून परत केले. अमीत हरीश जव्हेरी (वय-३५) हे शनिवारी (दि.९) लग्नासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्याची दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली. जव्हेरी यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खडक पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चार तासात जव्हेरी यांचे सोने परत मिळवून दिले.                            अमीत जव्हेरी हे लग्न समारंभासाठी कल्याणहून पुण्यात आले होते. ते पुणे स्टेशन येथून गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात जाण्यासाठी रिक्षात बसले. शितळादेवी चौकात उतरल्यानंतर त्यांची दागिन्याची बॅग रिक्षामध्ये विसरली. जव्हेरी यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मिठगंज पोलीस चौकीत धाव घेत घडलेला प्रकार पोलीस उप निरीक्षक मिना तडवी यांना सांगितला. पोलीस उपनिरीक्षक तडवी यांनी मार्शल कर्मचारी वैभव भोसले आणि नितीन दुरगुडे यांना रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले.

पोलीस कर्मचारी भोसले आणि दुरगुडे यांनी जव्हेरी हे ज्या मार्गाने रिक्षातून आले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला. तसेच रिक्षा मालकाचा नंबर आरटीओ कार्यालयातून घेऊन संपर्क साधला. रिक्षा मालकाने ही रिक्षा राजेंद्र घोडके याला चालविण्यास दिली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घोडकेचा शोध घेऊन रिक्षाची तपासणी केली असता जव्हेरी यांची विसरलेली बॅग रिक्षाच्या पाठिमागे आढळून आली. बॅग पोलीस ठाण्यात आणून ती बॅग जव्हेरी यांची असल्याची खात्री करुन बॅग जव्हेरी यांना परत केली. खडक पोलिसांनी चार तासात हरवलेली बॅग परत मिळवून दिल्याने अमीत जव्हेरी यांनी खडक पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक मिना तडवी, पोलीस हवालदार टोपे, पोलीस शिपाई वैभव भोसले, नितीन दुरगुडे यांच्या पथकाने केली.