बंदी आणा अन्यथा डान्सबार फोडू ;तृप्ती देसाई

1220

गिरीश भोपी, पनवेल प्रतिनिधी

डान्सबारमध्ये सरकारला काहीही आक्षेपार्ह वाटत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या सभागृहात डान्सबार सुरू करावा, अशी मागणी करत डान्सबारविरोधी त्वरीत अध्यादेश काढा अन्यथा, प्रत्येक डान्सबारमध्ये घुसून तोडफोड केली जाईल, असा खणखणीत इशाराच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.
  त्यांनी आपला मोर्चा पोलिसांकडे वळवून गृहखात्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. पोलिसांना राज्य सरकार पगार देत असताना त्यांना डान्सबार चालविण्याचे वेगळे हफ्ते कशाला हवेत, असा जळजळीत प्रश्‍न विचारत पोलिसांच्या खाबूगिरीमुळेच डान्सबार फोफावले असल्याची टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, परंतु दुसर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार घटनेने कुणालाही दिलेला नाही. मग डान्सबार हवेतच कशाला? महिलांचे संसार उद्ध्वस्त होताना सरकाला जराही पाझ़र फुटू नये, हे त्यांची संवेदनाच गोठल्याचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
 गर्दी कधी महत्वाची नसते, दर्दी हवे असतात, अशा शब्दांतून भाषणाला सुरूवात करून पनवेल संघर्ष समितीच्या समाजमनाचे रक्षण करणार्‍या धाडसी निर्णयाचे त्यांनी दिलखुलासपणे स्वागत केले. आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर कायदा हातात घ्यावा लागेल. ती तयारी आम्ही ठेवली आहे. हे सरकार फसवे आहे. त्यांचा अभ्यास अद्याप पूर्ण होत नाही. अध्यादेश काढू, निर्णय घेऊ, अशी आश्‍वासनांची खैरात करणारे सरकार आहे.
आंदोलकांना कारागृहात टाकण्याची कुटनिती सरकारची असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच पुणतांब्याच्या  कृषीकन्यांच्या आंदोलनावर त्यांनी पोटतिडकीने मत मांडून सरकाचे वाभाडे काढले. तसेच हिंमत असेल तर शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, असे आव्हानही देसाई यांनी दिले.