घरफोड्या करण्यासाठी विमान व रेल्वेने येऊन चोरी करणाऱ्यास अटक

1047

अनिल चौधरी, पुणे

उत्तरप्रदेशमधील बिजनोर येथून विमान आणि रेल्वेने येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोंढवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याबाबत शक्ती शिवाजी ननवरे यांच्या घरी पंधरा जानेवारी रोजी घरफोडी करून कपाटातील ७१,२५०रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी वाकड व निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत संबधित आरोपींनी घरफोडी केली होती.

याबाबत अधिक माहिती देताना परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड म्हणाले, आरोपी हे घरफोडी करताना तोंडाला रुमाल बांधून करत असत. घरफोडी करण्यासाठी ते रिक्षाचा वापर करत असत. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एका रिक्षाचा पुढील क्रमांक ३१३ हा हिरव्या रंगाच्या रिक्षात ते जाताना दिसले. ह्या रिक्षाच्या क्रमांकावरून  वाहिद खुर्शीद मन्सुरी वय ३३, धंदा- रिक्षाचालक रा. निगडी ,मूळ रा.जिल्हा बिजनोर उत्तरप्रदेश यास अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदार रियासत रियाजुद्दीन मन्सुरी वय २८, सध्या रा. निगडी मूळगाव बिजनोर उत्तरप्रदेश यास अटक करण्यात आली. त्याच्या मदतीने अजमेर राजस्थान येथे राहणारा त्याचा साथीदार रिजवान निजामुद्दीन शेख वय-२५ वर्षे, रा.हुसेनी मोहल्ला, अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील इतर साथीदारांच्या मदतीने चौथा आरोपी फैसल जुल्फिकार अन्सारी वय-२२ वर्षे, यास बिजनोर उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीआरोपींनी चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यातील गु.र.नं.७०/२०१९, वाकड पोलीस ठाण्यातील ४५४,३८०, १५३/२०१९ ४५४,३८० , १५४/२०१९ निगडी पोलीस ठाण्यातील गु.र.नं.५९/२०१९, ४५४,३८० या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १०,६४,७५० (सोन्या-चांदीचे दागिने) ४६८२५० किं.ची (सोन्याचे व चांदीचे दागिने) माल हस्तगत केला आहे.

 या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सलमान झुल्फ्कार अन्सारी हा विमानाने येऊन तर बाकीचे दोन साथीदार रेल्वेने जनरल डब्याने प्रवास करत हत्यारे घेऊन येत असत तर त्यांचा पुण्यातील रिक्षाचालक साथीदार मुशरफ यामीन कुरेशी त्यांना मदत करत असत. या सर्व आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी , परिमंडळ ५चे पोलीस उपआयुक प्रकाश गायकवाड, सहा.पोलीस आयुक्त मिलिंद पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवा. राजस शेख, इक्बाल शेख, विलास तोगे, पोना सुशील धिवार, सुरेंद्र कोळगे, योगेश कुंभार, निलेश वणवे, पो.शि. किरण मोरे, जगदीश पाटील, किशोर वळे, जयंत चव्हाण, अजीम शेख, पी.पांडूळे, उमाकांत स्वामी, आदर्श चव्हाण, उमेश शेलार यांच्या पथकाने केली. अत्यंत शिताफीने केलेल्या तपासाने कोंढवा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.