अनिल चौधरी, पुणे
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. पण ‘ती’ त्याला अशा वेळेला भेटते जेव्हा तो त्याच्या हनिमूनवर असतो. तेव्हा उडणारा गोंधळ आणि त्यातून तयार झालेला प्रेमाचा लव्ह ट्रँगल म्हणजे ‘ती and ती’.
सई-अनय-प्रियांका या तिघांची गोष्ट असलेला हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणार याचा अंदाज प्रेक्षकांना ट्रेलरमधून नक्कीच आला असणार. मृणाल कुलकर्णी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांनी यामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ट्रेलरमधून प्रेक्षकांना एक सुंदर सरप्राईज देण्यात आले होते आणि ते सरप्राईज म्हणजे सिध्दार्थ चांदेकरच्या छोट्याशा भूमिकेची झलक. आणि ‘घे जगूनी तू’ या गाण्यातून सिध्दार्थची आणखी एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या सिनेमाची इंटरेस्टिंग आणि प्रेक्षकांना सिनेमाशी कनेक्ट करुन ठेवेल अशी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे.
मोशन पोस्टर आणि ट्रेलरमधून प्रेक्षकांची या सिनेमाप्रती असलेली उत्सुकता वाढत असताना या सिनेमातील पहिले गाणे ‘घे जगूनी तू’ नुकतेच सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे. ‘घे जगूनी तू’ हे गाण्याचे बोल वलय मुळगुंद यांनी लिहिले असून गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी हे गाणं गायले आहे. सुंदर शब्द, आवाज यांच्यासोबतीने साई-पियुष या म्युझिकल जोडीने या गाण्याला दिलेले संगीत देखील अतिशय सुंदर आहे. हे गाणं पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे आणि सिध्दार्थ चांदेकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, वैशाल शाह, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. राहुल हकसर हे या सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर आहेत तर हा सिनेमा रजत एंटरप्राईझ नेशनवाईड रिलीझ करणार आहेत.भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ सिनेमा येत्या ८ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.