आपण सहिष्णुता हरवत चाललो आहोत काय? किरण नगरकर यांचा सवाल

1196

अनिल चौधरी,पुणे

“ज्ञानेश्वर, तुकारामांपासून इतर अनेक संतांची परंपरा आपल्याला आहे. शांतता, अहिंसा आणि सहिष्णुता यांचे संस्कार देणारा आपला देश असूनही दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी यांसारख्या विचारवंतांच्या हत्या होतात. गांधीजींच्या मारेकऱ्याचे कौतुक केले जाते. हे असे का होत आहे? आपल्याला झाले तरी काय? आपण आपली सहिष्णुता हरवत चाललो आहोत काय?” असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी उपस्थित केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण नगरकर यांच्या हस्ते झाले. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या संमेलनाच्या गंगाधर पानतावणे विचारपीठावरून नगरकर बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, ‘बार्टी’चे यादव गायकवाड, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.

किरण नगरकर म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास बघितला, तर महाराष्ट्राने देशाला खूप सुज्ञ लोक दिले. अनेक थोर विचारवंत, तत्वज्ञ देशाला दिले. पुरातन संस्कृतीला आधुनिक वळण दिले आणि मराठी माणसाला २१ व्या शतकात आणले. पण आज आपण त्यांची शिकवण विसरलो. मैत्रीने आपण खूप काही मिळवू शकतो, पण हल्ली माणसाला माणूस म्हणून समाजण्यापेक्षा हल्ला करणे, मारून टाकणे असे प्रकारच वाढले आहेत.” यासह त्यांनी आपल्या साहित्यिक जडणघडणीमागचा प्रवास उलगडला. गांधीजींच्या चरित्राचा व पुण्याचाही यात महत्वाचा हातभार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “लोकशाहीला सुसूत्रतेत बांधण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आपल्याला लिहिण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले. पण याचा वापर मनापासून व्यक्त होण्यासाठी करावा. प्रत्येकाने आपला धर्म घरी पाळावा. सार्वजनिक ठिकाणी येताना संविधान हाच एकमेव धर्मग्रंथ असला पाहिजे. दलित साहित्याची दिशा बदलणे आवश्यक आहे. काळ बदलत आहे, जग हायटेक होत आहे. त्यामुळे दलित तरुणांचेही अनुभव विश्व बदलत आहे. परंतु समोर येणारे साहित्य कलाकृती ही त्याच त्या पद्धतीची उद्वेग, विद्रोह व्यक्त करणारी आहे. ते आता बदलणे आवश्यक आहे.”

‘विद्यापीठात तयार होत असलेले नवे सभागृह पुढच्या वर्षीपासून या संमेलनासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाईल,’ अशी घोषणा डॉ. नितीन करमळकर यांनी केली. डॉ. रावसाहेब कसबे यांनीही आपले विचार मांडले. परशुराम वाडेकर यांनी स्वागत केले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. धर्मराज निमसकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी, प्रवीण डोणे व शिरीष पवार यांनी सादर केलेल्या ‘भीमस्पंदन’ भीमगीतांच्या सुरेल कार्यक्रमाने सभागृह भारावले. डॉ. पी. ए. इमानदार यांच्या हस्ते ग्रंथ दलनाचे उद्घाटन करण्यात आले.
—————–
संमेलनाध्यक्षांचे मनोगत
संमेलने भरविण्याच्या असाध्य रोगाची लागण
आपल्याला साहित्य, नाट्य संमेलनाची शंभरीकडे वाटचाल करणारी परंपरा आहे. परंतु, सकाळ साहित्यावळे लोक दलित, विद्रोही, पर्यायी साहित्याला शत्रू मानतात. त्यातून अनेक विरोधी, पर्यायी आणि समांतर अशा संमेलनाच्या जुळण्या सुरु झाल्या. कालांतराने विद्रोही संमेलनाची धार कमी झाली. संमेलनाच्या नावावर लोकांना वेठीस धरण्याचे प्रकारही सुरु झाले. मतपेढ्या आणि स्वार्थाच्या भावनेतून संमेलने भरविण्याचा असाध्य रोग लागल्याचे दिसत आहे. या संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग संसदीय राजकारणाचा मार्ग बनू लागला. त्यातून साहित्य संमेलनाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. आपल्याला खंडित करणारी एक शक्ती कार्यरत झाली. आजही वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला ती शक्ती अनुभवायला मिळते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बाबतीत जो गोंधळ झाला, त्यातील अनेक घटना हास्यास्पद आहे. अरुणा ढेरे यांनी अशा घटनेचा निषेध करणे विनोदी होते. तात्पुरती असहमती दाखविण्याचे प्रकार दिसून आले. डॉ. अरुणा ढेरे या सतर्क नाहीत. त्यांना कोणतेही वास्तव माहिती नाही. कारण त्या अज्ञात झऱ्यावर कवितेचा रियाझ करत असाव्यात. कारण आज लेखक-कार्यकर्ता यांच्यात होणारे अवस्थांतर असावे. विज्ञान आणि शास्त्र यातील अंतर वाढवत धर्म आणि अध्यात्माकडे नेण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. हातात सत्यसाईबाबांची राख आणि हळदीचे पेटंट घेऊन फिरणारा म्हणजे शास्त्रज्ञ अशी ओळख तयार होत आहे. संशोधनाला धर्माच्या चौकटीत नेण्याचा प्रयत्न घातक आहे. नाटक-सिनेमातील एकल संस्कृतीच्या धुडगुसामुळे सांस्कृतिक वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित होतो. त्यातून ठराविक समूहाचे लोक यशस्वी होताना आपण पाहतो. श्रमिकांच्या वस्त्या, चाळी, सार्वजनिक उत्सव हा नाटकांचा माहोल होता. मात्र आज परिस्थिती बदलल्याने अनेक कलाकार हालअपेष्टा सहन करताहेत. सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठी साहित्यात समीक्षा नाही. त्याचे वळण अदृश्य आरक्षाप्रमाणे आहे. अकॅडमिक वातावरणात ती अडकून पडली आहे. सततच्या होणाऱ्या विभाजनाचा आणि राजकीय फायदा लक्षात घेऊन होणारी तोडफोड गंभीर आहे. हे बदलण्यासाठी समांतर असलेल्या सम्यक साहित्यासारख्या चळवळीची निश्चित गरज आहे, असे वाटते.
———————–