कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

1303

अनिल चौधरी,पुणे:

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवारी दि. 2 आणि रविवारी दि. 3 मार्च रोजी पुणे विभागात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पुनर्निरिक्षण कार्यक्रमात वंचित राहिलेल्या नागरिकांना नावनोंदणी करून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पुणे विभागातील कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याच माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुक 2019 च्या तयारीचा आढावा आणि विशेष मतदार नोंदणी मोहिम या बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उप आयुक्त (महसूल) प्रताप जाधव उपस्थित होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकानुसार ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. दि. 23 व दि. 24 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या विशेष मोहिमेद्वारे नावनोंदणी करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या विशेष मोहिमेमुळे ज्यांना नव्याने मतदार नोंदणी करायची आहे, ज्यांचे मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे, अथवा मतदार नोंदणी अभियानात ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, अशा नागरिकांना मतदार नोंदणीची ही शेवटची संधी आहे. या मोहिमेत नोंदणी करणाऱ्या मतदारांची नावे आगामी निवडणुकपूर्व यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
अशी करा नोंदणी 
– प्रत्येक मतदार केंद्रावर मतदार नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन.
– या केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील.
– ‘बीएलओ’कडे अर्ज क्रमांक ‘६’, ‘७’, ‘८’ व ‘८ अ’ हे अर्ज उपलब्ध असतील.
– मतदारांना हे अर्ज भरून ‘बीएलओ’कडे देता येईल.
– नोंदणी झाल्यावर मतदारांची नावे निवडणूकपूर्व मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल.
नव मतदारांच्या नोंदणीवर विशेष भर
-ज्या युवक-युवतीचे वय 18 ते 19 वर्षे आहे त्यांच्या नाव नोंदणीवर विशेष भर
-कोल्हापूर, पुणे, सोलापूरच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी नोंदणी बाबत चर्चा.
-शिकण्यासाठी शहरात आलेल्या नवमतदारांची नोंदणी त्यांच्या गावी करण्याची व्यवस्था.
– नवमतदारांची नोंदणीवर विशेष भर.
गो-व्हेरीफाय मोहिम
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांजवळ १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी उपलब्ध असेल. या यादीत मतदारांना आपल्या नावाची पडताळणी करता येणार आहे. मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठीच असून, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी.
मतदार यांद्याचे चावडी वाचन
ग्रामीण भागातील निरक्षर मतदारांसाठी मतदार याद्यांचे त्यांच्या गावातील चावडीवर वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे निरक्षर व्यक्तीलाही आपल्या नावाची खात्री मतदार यादीत करता येवू शकते.
दिव्यांगांसाठी विशेष सोयी
मतदान प्रक्रीयेत दिव्यांग व्यक्ती राहू नये, मतदान करताना त्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मतदार संघातील मूकबधिर व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
महिलांचा टक्का वाढला
पुणे विभागात नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिलांच्या नावांच्या नोंदीची संख्या वाढली आहे. या मुळे मतदार यादीत महिलांचा टक्का वाढला आहे. युवकांबरोबर महिलांच्या नावनोंदणीला ही विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. नवविवाहीत महिलांच्या नावांची नोंदणीही करण्यात येत आहे. नवविवाहितांना नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे.

येथे करा ऑनलाइन नावनोंदणी
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या वेबसाइटवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा.
www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अधिक माहिती घेता येईल.
– नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध.
*****