सार्वत्रिक निवडणूक तयारी संदर्भात ‘स्वीप’ आणि ‘पीडब्ल्यूडी’ समितीची बैठक संपन्न

680

अनिल चौधरी, पुणे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विविध समित्यांची स्थापना करुन तयारीचा आढावा घेण्यात येतो. या अनुषंगाने ‘स्वीप’ आणि‘पीडब्ल्यूडी’ सुकाणू समितीची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी मतदान जनजागृती मोहिम, मतदान संकल्प पत्र वितरण, शाळा व महाविद्यालयात इलेक्टोरल लर्नींग क्लबची स्थापना करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये मतदार साक्षरता मंच स्थापणे,ग्राम पंचायत स्तरावर ‘चुनाव पाठशाला’ आयोजित करणे, दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करुन निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे, निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे याचा आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी उपस्थित अधिकारी व समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.