ती अँड ती – खुसखुशीत प्रेमाची चकचकीत गोष्ट

746

प्रेम, पहिलं प्रेम, ते मिळवण्यासाठी चाललेली धडपड, त्या धडपडीमध्ये विविध प्रकारे प्रेमवीरांनी खाल्लेली माती, प्रेमाचा त्रिकोण आदी प्रेमाच्या संदर्भातील विषय अनेक मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाची या प्रकारातील चित्रपटाची हाताळणी वेगळी असते. ती अँड ती हा चित्रपट रोमॅण्टिक प्रकारातील असला तरी दिग्दर्शकाची वेगळी हाताळणी, अभिनेत्यांचा सहज अभिनय, संगीताचा चपखल उपयोग, खुसखुशीत संवाद त्याला बांधीव पटकथेची साथ, श्रीमंत निर्मितीमूल्य यामुळे ती अँड ती हा चित्रपट मनोरंजनाचा वेगळा मसाला झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही नेहमीप्रमाणे सरधोपट प्रेमपट न पाहता नवीन जनरेशन मधील खुसखुशीत प्रेमाची चकचकीत गोष्ट पाहिल्याचे समाधान मिळते.

रमा माधव आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या दोन वेगळ्या प्रकारच्या रोमँटिक कथा प्रेक्षकांसमोर यापूर्वी आणणाऱ्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी ती अँड ती चित्रपटातून नवीन जनरेशनची भाषा आपल्या दृश्यातून चांगल्या प्रकारे मांडली आहे. प्रेमाचा त्रिकोण आणि त्यामध्ये निर्माण झालेली गुंतागुंत दाखविण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाल्या आहेत. इतर चित्रपटांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या टिपिकल लव्ह ट्रँगल प्रमाणे ही प्रमाणे ही गोष्ट नाही. येथे पारंपारिक रुसवे-फुगवे नाहीत, की प्रेमपटामध्ये वापरण्यात आलेले सरधोपट साचेबद्धपणा नाही. अनय ( पुष्कर जोग) हा टिपिकल पुणेरी वरण-भात साजूक तूप प्रकाराचा मुलगा. शाहरुख खानचा जबरदस्त फॅन असलेल्या अनयला आपले आयुष्यही एखाद्या रोमॅण्टिक चित्रपटाप्रमाणे घडावे असे वाटते. चौथीत असताना प्रियंका या मुलीशी झालेले एकतर्फी प्रेम अनय आजही विसरू शकलेला नाही. परंतु चित्रपट आणि वास्तवामध्ये फरक असतो तो त्याच्या आयुष्यात अरेंज मॅरेज च्या रूपाने येतो. सई (प्रार्थना बेहरे) हिच्याशी लग्न झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल अशी त्याची अपेक्षा. परंतु तेथूनच त्याच्या आयुष्यात प्रेमाचा झांगडगुत्ता सुरू होतो. लंडनला हनीमून साठी गेल्यानंतर एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या आपले चौथीतले पहिले प्रेम प्रियांका (सोनाली कुलकर्णी) त्याच्यासमोर प्रकट होते. अद्याप आपल्या बायकोलाही नीटसे ओळखू न शकलेला अनय प्रियांका आणि सही यांच्यामध्ये अडकतो. सुरुवातीला प्रेमाचा त्रिकोण वाटणारी ही कथा नंतर अतिशय वेगळे वळण घेते. प्रियंकाला मिळवण्यासाठी अनय धडपड करतो आणि त्यामध्ये प्रत्येक वेळी माती खातो. अखेर प्रियांका आणि सई यापैकी कोणाची निवड करतो? सत्य उघड झाल्यानंतर दोघीजणी अनयला स्वीकारतात का हे पडद्यावरच पाहिले पाहिजे. कलाकारांचा सहज अभिनय, दिग्दर्शकाची नाविन्यपूर्ण हाताळणी आणि पारंपारिकतेला फाटा दिल्यामुळे चित्रपट अतिशय फ्रेश आणि गुड लुकिंग झाला आहे. यामध्ये निर्माते आणि कार्यकारी निर्माते यांचे चित्रपटाच्या चकचकीतपणा बद्दल आणि निर्मितीमूल्य बद्दल कौतुक करायला हवे. कलाकारांच्या वेशभूषेपासून ते चित्रीकरण स्थळापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नाविन्य आहे. यामुळे चित्रपटाला वेगळ्या प्रकारचा फ्रेश लुक आला आहे. कॅमेरामन हर्षवर्धन पाटील यांच्या कॅमेराने लंडन अतिशय सुरेख दाखवले आहे. कॅमेराचा योग्य वापर केल्यामुळे लंडन हा एक प्रकारे कथेतील एक पात्रच होऊन जाते. यामुळे हिंदी चित्रपटांमध्ये चकचकीतपणा पाहण्याची सवय झालेल्या तरुण पिढीलाही हा चित्रपट निश्चितच आवडेल.
संगीतकार साई पियुष यांची गाणी चित्रपटाला पुढे घेऊन जातात विशेषतः खाल्ली माती आणि सिली सिलि सुरू कहानी गाणी चित्रपट संपल्यावरही प्रेक्षक गुणगुणत बाहेर पडतात गीतकार वलय मुळगुंद यांनी आपल्या शब्दातून चित्रपटाचा मूड अतिशय योग्य प्रकारे प्रकारे पडला . पुष्कर जोग हा भांबावलेल्या प्रेमवीरांच्या भूमिकेमध्ये मजा आणतो. त्याच्या अभिनयामध्ये अनेकदा काॅकटेल आणि लव आज कल मधील सैफ अली खान ची झलक दिसते. सोनाली कुलकर्णी हिने हॅपी गो लकी प्रियांका अतिशय सहजपणे साकारली आहे. प्रार्थना बेहेरे हिच्या सईच्या पात्राचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. मॅरेज मटेरियल असणारी सई लंडनमध्ये नवर्‍याचे प्रताप कळल्यावर संयम ढळू न देता प्रसंग हाताळणारी सई प्रार्थनाने अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. संवादापेक्षा चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांनीच तिने आपले पात्र उठावदार केले आहे. चित्रपटातील सरप्राईज पॅकेज असलेला सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या संयमित अभिनयाने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. छोट्या भूमिकांमध्येही श्रीकर पित्रे, वंदना वाकनीस आणि मोहन दामले आपली छाप पाडून जातात. प्रेमाचा टिपिकल त्रिकोण नाहीतर मग ती अँड ती काय आहे? अनयला आपले खरे प्रेम मिळते का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि इतर मराठी चित्रपटांमध्ये सहसा अनुभवायला न मिळणारा चकचकीत पणा, फ्रेश लुक आणि फीलगुड चा अनुभव घ्यायचा असेल तर ती अँड ती एकदा नक्कीच पाहायला हवा…

दिग्दर्शक : मृणाल कुलकर्णी
कलावंत – पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे
लेखक – विराजस कुलकर्णी
संगीतकार – साई पियुष
गीतकार – वलय मुळगुंद

 

 

योगेश बारस्कर