‘धुमस’ चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीजर प्रदर्शित

1388

अनिल चौधरी,पुणे,

बहुचर्चित ‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील युवा नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.

सामाजिक वास्तव मांडणाऱ्या ‘धुमस’ चित्रपटाच्या टीजर मध्ये रियल लाईफ हिरो असणारे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर जबरदस्त ऍक्शन सिन्स करताना दिसत असल्याने सोशल मिडीयावर या टीजरची जोरदार चर्चा होत आहे. नेते हे अभिनेते म्हणून झळकल्याने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, रोहन पाटील, साक्षी चौधरी, विशाल निकम, कृतिका गायकवाड, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आणि प्रभावी ऍक्शन सिन्स ‘धुमस’ च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर चित्रपटाचे निर्माते असून डी. गोवर्धन सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे गीतकार अविनाश काळे आहेत, पी. शंकरम यांचे संगीत लाभले असून सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत. तर चित्रपटाची तांत्रिक बाजू दक्षिणेतील नामांकित तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. सामाजिक वास्तव दाखवणारा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.