अनिल चौधरी,पुणे,
लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या खर्च तपासणीकरिता जिल्हा दर सूची तयार करण्यात आली आहे. या सूचीमधील साहित्याच्या दराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह तसेच अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी खर्च व्यवस्थापन कक्ष अजित रेळेकर आणि वरिष्ठ कोषागार अधिकारी रमेश कुलगोड उपस्थित होते. ही दरसूची निश्चित करताना टेंडरच्या माध्यमातून व मान्यताप्राप्त असोसिएशनच्या मार्फत दर मागवले होते व त्यानुसार या साहित्याची दर सूची तयार केली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. काही प्रतिनिधींकडून काही साहित्य दराबाबत आक्षेप नोंदविले असता त्यांच्याकडून ज्या साहित्य दराबाबत आक्षेप आहेत त्या साहित्याच्या दराची बाजारांमध्ये खातरजमा करून त्याप्रमाणे आक्षेप नोंदवावेत, असे सांगण्यात आले. राजकीय पक्षांकडून सादर करण्यात आलेले दर व या साहित्य सूचीतील दर याची पडताळणी करून व त्याप्रमाणे खात्री करून अंतिम दर सूची तयार करण्यात येईल व ही दर सूची नामनिर्देशनाच्या वेळी उमेदवारास देण्यात येईल व त्याप्रमाणेच खर्चाची नोंद घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले.राजकीय पक्षांनी कोणताही खर्च करताना कायदेशीर नियम पाळले पाहिजेत, असेही श्री. रेळेकर यांनी सांगितले. वृत्तपत्रांमधील जाहिरात दराबाबत राज्यातील सर्व वृत्तपत्रांचे जाहिरातीचे दर शासनाच्या http://www.dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगितले.