मल्हार न्यूज नेटवर्क :-
जांभाया टाळण्याचा उत्तम उपाय ‘झोपा’, मतदार दुपारी झोपेत असतात बेल वाजवू नये मत मिळणार नाही, पुणे तिथे काही नसे उणे, आपला मान इथेच सोडायचा आणि प्रवेश करायचा, इथे फक्त आमचाच मान असतो, आमचे इथे ठोक भावात अपमान करून मिळेल अशा टिपीकल ‘पुणेरी’ पाट्या आणि तिरकस बाणांची मैफल फर्ग्युसन रस्त्यावर सोमवारी सायंकाळी अवतरली. निमित्त होते पुणे टॅाकीज प्रा. लि. च्या वतीने “६६ सदाशिव” या आपल्या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीचा आनंद रंगपंचमीच्या निमित्ताने पुणेकरांना लार्ज कॅनव्हासवर व्यक्त होण्याच्या केलेल्या आवाहनाचे.
चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर यांनी पुणेकरांना, रंगपंचमीचा रंगोत्सव आनंद देणारा ठरावा यासाठी वॉल पेंट, सुभाषित, सेल्फी पॅाईंट व चित्र रेखाटन यासह, पुण्याच्या गुणवैशिष्टयांचं ब्रश-रंग- यांचा वापर करून रंगांची ऊधळण करून, नव्या पुण्याच्या स्मार्ट उपक्रमांत भर घालण्यासाठी हे आयोजन केले होते. काही पुणेकरांनी शब्दांबरोबरच चित्र आणि व्यंगचित्र रेखाटत आपल्या भावना व्यक्त केल्या.
“६६ सदाशिव” हा योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट, पुण्याच्या काही भन्नाट स्वभाव-गुणधर्मांचं हटके दर्शन घडवणार आहे. त्यामुळे हा “६६ व्या कलेचा, आगळा-वेगळा ऊपक्रम राबविण्यात आला. यावेळी निर्माते, दिग्दर्शक, चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते.